कवी श्री धनाजी जनार्दन बुटेरे आपले शब्दांचा गुलमोहर अनुदिनी वर आपले स्वागत करीत आहे सर्व कविता, लेख, कथा याचे स्वामीत्व हक्क राखून ठेवले आहेत.

मंगळवार, १५ नोव्हेंबर, २०१६

ललित लेख आनंदाचे झाड

आज तुम्हाला कोणी म्हणला "चल तुला विमानात फुकट फिरवतो "तर तुम्ही काय कराल ?नक्कीच तुम्ही विमानात बसून फिरून याल.मग असाच मोह मला माझ्या लहानपणी व्हयचा पण ते विमानात बसायचे नाही तर.ट्रकमधे बसायचा.ते दिवस होते साधारण ऐंशीच्या दशकातले.माझं गाव शहरापासून वीस बावीस किलोमीटर,त्यावेळी आजच्या सारखे चकाचक रस्ते नव्हते. की वाहनांची गर्दी नव्हती.गावातील रस्त्यांवर सामसुम असायची.चुकून एखादे वाहन दिसले तर काय सुख विसरू नका. साधे खडीचे धूळीने भरलेले रस्ते होते. कोकणातली ती लाल माती. आजच्या सारखी वाहनांची रहदारी ही नव्हती.चुकून एखादा ट्रक गावात धूळ उडवत यायचा ,आणि आम्हाला काय तो आनंद व्हायचा.त्याचे वर्णन.शब्दात करता येणार नाही.ट्रक धुळीचे लोळ उडवत चौखूर धावायचा त्या पाठोपाठ आम्ही दहा पंधरा मुले त्या धुळीच्या लोळात दिसेनासे होत.कोणी तिला पकडून पाठीमागे लटकत जायचे.कोणी पडायचे.मग ट्रक दिसेनासा होई.आम्ही सर्व सवंगडी मग घडलेल्या गमतीजमती एकमेकांना मोठ्या रंगवून सांगत आसू .हे पुरान आम्हाला बर्याच दिवस पुरत असे.कोणी तरी पडलेला असायचा.त्याला झालेली जखम तो " आठवण ठेव "म्हणून दाखवायचा.गावात एखादा जीप यायचा.त्याला पहायला अख्खा गाव गोळा व्हायचा.आलीच तर अजून एखादी फटफटी यायची तिचा चालक आम्हाला " परग्रहावरून आलेला एखादा देवदूत वाटे. बहुधा आम्हाला ट्रक मध्ये बसायची संधी यायची ती निवडणूकींच्या काळात.त्या वेळी आजच्यासारख्या निवडणुका नव्हत्या.त्यावेळी मोठमोठे ट्रक सजवून त्या मध्ये स्पिकर माईक मोठमोठे भोंगे लावून मोठमोठ्याने ओरडत असत.आमच्या साठी मात्र ही पर्वणीच असायची.कारण त्यांना ओरडण्यासाठी माणसांची गरज असायची आम्ही मुले त्याना फुकटात उपलब्ध होत असू.मग काय विचारताय राव पाच सहा किलोमीटर आनंदाने प्रवास करायचा मग तिथून परत मागे चालत यायचे पण चालण्याच्या पेक्षा बसवण्याचा आनंद फार मोठा असायचा.पुन्हा दुसर्या दिवशी दुसर्या पक्षाची ट्रक गाठायचा .माघारी येताना चर्चा रंगत त्या कशी मजा केली यावर.चारपाच किलोमीटरची पायपीट आम्ही विसरून जायचो.येताना परतायचो ते विजयी मृद्रेनेच.जनू स्वर्गसुखच उपभोगले. आमच्या लहानपणी लग्नसमारंभ फार साध्या पध्दतीने पार पडत असत.अर्थात व-हाड बहुधा बैलगाडीतून निघायचं पुढे नैरोबाची बैलगाडी असायची . तो बहुधा शर्यतीतला छकडा असायचा. पाठोपाठ इतर बैलगाड्या सापा सारख्या लांबलचक पसरलेल्या असायच्या. पन्नाससाठ बैलगाड्या एकमेका पाठीमागे ; हा मनोहारी देखावा डोळ्यांचे पारणे फेडायचा.आता तो देखावा कधीच पहायला मिळणार नाही याची पण रुखरुख मनात आज पण आहे. लग्नाला जायचे एकमेव कारण बैलगाडीची सफर करायला मिळयची.पुढे नविन शोध लागला आणि लग्नाचे व-हाड ट्रक मधून जाऊ लागले.मग आमच्या आनंदाला पारावार उरला नाही.गावातील एक पण लग्न आमच्या हातून सुटत नसे.ट्रक हा लहानांपासून तर मोठ्यांच्यापण आवडीचा विषय होता.कारण आमच्या पेक्षा मोठ्या पिढीतील लोकांना ट्रक मध्ये बसायला केंव्हा मिळाले असणार मग ते ही गर्दी करायचे त्यामुळे ट्रक माणसांनी अक्षरशः फुललेल्या असायचा.कधीकधी खूप गर्दी व्हायची लहानमुले अक्षरशः चेंगरायची .पण गर्दी कमी व्हायचे नाव घेत नव्हती.त्यात रस्ते म्हणजे दिव्य हलतडुलत ट्रक पोहचल्यावर सर्वांचे चेहरे पहाण्यासारखे असायचे " कारण ट्रकने उडविलेला धुलारा सर्वांनी अंगाखांद्यावर घेतलेला असायचा.हे प्रत्येकाचे राजबिंडेरुप मी माझ्या आयुष्यात पुन्हा कधी पाहिले नाही.ही गर्दी चेंगरायची पाहुन मला आई बर्याच वेळा लग्नाला पाठवत नसायची.तेंव्हा फारच हिरमुसला होऊन जायचो.कारण त्या वेळी वर्हाडाचे ट्रक कोसळून अपघात व्हयचे.आई घाबरून पाठवत नसायची.पण आम्ही आयुष्यातील फार मोठ्या आनंदाला मुकायचो हे आईला कसे कळणार. अजून एक पर्वणी ट्रक मध्ये बसायला यायची ती म्हणजे शाळेची सहल ट्रक मध्ये जायची.हा शोध ज्या गुरुजींनी लावला त्या गुरुजींनी सर्वमुले धन्यवाद देत असतील.सहलीमध्ये काय पाहिले या पेक्षा ट्रक मधे बसण्याचा जो आनंद व्हायचा ते स्वर्गीय सुख कोठे मिळायचे ? आज जेव्हा हे सारं मी आठवतो. तेव्हा वाटतं आपण किती मुर्खासारखे वागायचो.पण हा मुर्खापणा नाहीच.कोणी फुकट विमानात फिरायला मिळाले म्हणून पर्यटन करत असेल,कोणी फुकट सहलीला जात असले ; तर तो मुर्खापणा नाही मग आज पासून वीसबावीस वर्षांपूर्वी कोणी जर ट्रकमधे बसून आनंद घेत असेल तर तो मुर्खपणा कसा?त्यावेळी ते सहजपणे उपलब्ध नव्हते म्हणून त्या मधे रस होता आज ते सहजच उपलब्ध आहे म्हणून रस उरला नाही.शेवटी सुख किंवा आनंद कशात असतो.जी गोष्ट नविन आहे त्या मधे.माझ्या लहानपणी सुखाच्या कल्पना वेगळ्या होत्या आज वेगळ्या आहेत.शेवटी सुख हे सार्यानांच हवं असते.पण सुखाच्या कल्पना बदललेल्या असतात.ट्रक हा मला सुख देणारं माझ्या आनंदाचे झाड होतं. ✒ प्रा.श्री.धनाजी जनार्दन बुटेरे मु.पोई ; पो.वाहोली ; ता.कल्याण. जि.ठाणे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा