कवी श्री धनाजी जनार्दन बुटेरे आपले शब्दांचा गुलमोहर अनुदिनी वर आपले स्वागत करीत आहे सर्व कविता, लेख, कथा याचे स्वामीत्व हक्क राखून ठेवले आहेत.

शनिवार, २६ नोव्हेंबर, २०१६

माझा लेखन प्रपंच (1)

                       मी कधी लिहायला लागलो हे मला स्पष्ट आठवते. 1993 सप्टेंबर महिना मी काॅलेज मध्ये शिकत होतो.मराठी कविता या साठी महनोरांच्या " रानातल्या कविता " हे पुस्तक अभ्यासाला होतं.प्राध्यापक श्री.अरूणा देवरे सर कविता शिकवायचे त्यांचा प्रभाव मनावर होताच. दहावीला बालकवींच्या " फुलराणी "या कवितेने मनावर मोहिनी घातली होती.बहिनाबाईंच्या कविता मनावर अधीराज्य गाजवत होत्या. नुकताच वरवर वाचण करायला लागलो होतो.इंदिरा संताचा "मृगजळ "अभ्यासाला होता. आणि याच काळात लातूर मधिल किल्लारी येथे भूकंप झाला होता. 1993 चे ते भयानक "बाॅम्बस्फोट" माझ्या जीव्हारी लागले. नि माझ्या पहिल्या
"विपरीत" या कवितेने जन्म घेतला.

जगात विपरीत घडले ;
जमिन हलली
लोकांच्या उरावर ;
घरं कोसळली. ॥

जगात विपरीत घडले ;
ऐन दिवाळीत ,
रेल्वेत बाॅम्ब उडले
जगात विपरीत घडले ;

              हे शब्द मला सुचले. लिहीण्यात एवढी सुस्पष्टता नव्हती. प्रगल्भता नव्हती. पण मला ती कविता वाटली. पुढे अशाच रचना स्फुरत गेल्या. मी कागदावर उतरून घेत गेलो.आता कविता हा आवडीचा विषय होऊन गेला. कविता वाचन कवितेचा अभ्यास करून पुढे लिहीत राहीलो. मित्रांना घरातल्या माणसांना वाचायला देवूनी लागलो.कुणी खूप छान म्हटले की काय तो आनंद. फक्त " स्वांतसुखाय "म्हणून लिहीत राहीलो. साधारण पन्नास रचना झाल्या असतील मला कुठे तरी छापून याव्यात असं वाटायचं. इतर साहित्यिकांचे पुस्तकात छापलेले पाहून मला ते वाटू लागले. बस्स ठरलं कुठे तरी प्रकाशित झाल्याच पाहिजेत मनात चंग बांधला. वर्तमानपत्रात कुठे साहित्य पाहिजे असल्याचे छापून येई मी माझ्या कविता सर्वत्र पाठवू लागलो.कदाचित कुठे छापले पण जात असेल पण ते अंक माझ्या हाती येत नव्हते. लिहायला संधी दिवाळी अंकात मिळायची. भरपूर आवाहने वर्तमानपत्रात येतात. पण ही मंडळी आपला अंक निघाला की त्या साहित्यिकाला विसरतात. एक अंक ही कर्मद्रारिद्र मंडळी त्या नवोदित साहित्यिकाला पाठवत नाही. काही मंडळी याला अपवाद आहे. असो.अशाच एका दिवाळी अंकात माझी "दिवाळी "ही कविता छापून आली. काय तो आनंद? शब्दात सांगू शकत नाही. माझ्यातल्या कवी ला ऊर्मी मिळाली. हेच ते रसायन जे साहित्यिकाला हवे असते. पुढे दरवर्षी दिवाळी अंकात काही कविता प्रकाशित होऊ लागल्या.लिखाणाला नवीन उम्मेद मिळाली कविता लिहिण्याचा वेग वाढला.झपाटल्यासारखा लिहू लागलो.शंभर च्या वर कविता लिहून झाल्या काही खूप सुंदर कविता आहेत. मग मोर्चा साहित्य स्पर्धा कडे वळविला. काव्यस्पर्धांसाठी कविता पाठवू लागलो. बर्याच वेळा ना उम्मेद झालो अपयश येत गेले. पण लेखण प्रपंच सोडला नाही. अशाच वेळी एका राज्यस्तरीय कविता स्पर्धेमधे "झाली माझी साठी" या कवितेला उत्तेजनार्थ व लगेच काही दिवसात "झोपडी"माझ्या कवितेला दुसरा क्रमांक मिळाला. पुढे बर्याच कविता स्पर्धेमधे एक दोन उत्तेजनार्थ पुरस्कार मिळाले. याच वेळी एक मोठी संधी मला मिळालीआकाशावाणी वरमाझा काव्य वाचनाचा कार्यक्रम वाचून झाला पुढे "युवा काव्य पुरस्कार " देशप्रेमी" पुरस्कार. "काव्यभूषण "पुरस्कार. "कलायत्री पुरस्कार ."नांदब्रम्ह" पुरस्कार. "' ॐ साई" काव्य पुरस्कार. हे काव्य लेखनासाठीचे पुरस्कार मिळाले. खूप आनंद वाटला. लिहायला प्रेरणा मिळत गेली. आपयशाने कधीच खचलो नाही. कथा लेखनाकडे कसा वळलो हे मात्र कळले नाही. माझी दुसरी कथा "कशा साठी पाण्यासाठी. .....?" या कथेला तीन कथा स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळाला. ही कथा पाच सहा मासिकात दोन दिवाळी अंकात प्रकाशित झाली.त्या नंतरची "ठोल्या "ही माझी तिसरी कथा एका दिवाळी अंकाने घेतलेल्या कथा स्पर्धेत विजेती ठरली. पुढे असंख्य कथा वेगवेगळ्या दिवाळी अंकात प्रकाशित झाल्या. कथा बरोबर एकांकिका लिहून पाहिली. एक नाटक ही लिहले "देवा शपथ खरं सांगते" पण आज माझ्या कडे याची प्रत नाही घरी कुठे तरी रद्दीतून बाहेर पाडली. ती कायमची. पुन्हा नाही लिहले मग. आपण कवी म्हणून नावारुपाला यावे असे मनोमन वाटते. पण तसा मंच नवोदितांसाठी नसतो.नवीन लेखकांचे साहित्य दर्जेदार नसते अशी ओरड होते. पण मला वाटतय वाचक वलय असणारी मंडळीच्या वाचनासाठी विचारात घेतात .कविता हा साहित्य प्रकार विकत घेऊन वाचवायचा नसतो.आणि तो अपरिचित कवीचा असेल चाळून सुध्दा पहायचा नसतो या धारना साहित्य विश्वात रुळलेल्या आहेत. याचा सर्वांधिक फटका नवीन कवीना बसतो.

          ✒ श्री.धनाजी जनार्दन बुटेरे
                पोई कल्याण ठाणे
            djbutere@gmail.com
                 ( c ) copyright

माझा लेखन प्रपंच (2)

                  आता माझी कविता तरूण होत होती. तीला हळूहळू प्रगल्भता येत होती. वाचकांच्या मनात रुंजी घालत होती. मग आपले पण कवितेचे एक छान पुस्तक असावे असे वाटू लागले.साहित्यिक म्हणून आपली ओळख तयार व्हावी असे वाटू लागले. कुणी प्रकाशक फुकटात प्रकाशित करायला तयार नसतो हे ऐकून होतो.स्वतःच्या पैशाने छापायचे म्हटले तरी त्या वेळेस दहा बारा हजार लागायचे. शोध सुरू होता. पत्राने प्रकाशकाना विचारना चालू होती. नकार घंटा वाजत होती. माझ्याकडे पुस्तक प्रकाशित होईल एवढे पैसे नव्हते. मीच नोकरी साठी बेकार फिरत होतो.खिशात मुलाखती साठी जाण्यास पैसे नसायचे तर पुस्तक छापायला कुठून आणणार. आणि पुस्तक छापून काय मिळणार? पण मी प्रयत्न सोडले नाही. नोकरीचा शोधा बरोबर प्रकाशकाचा शोध सुरू होता. दरम्यान च्या काळात पियुषा सहस्त्रबुध्दे या कवयित्रीचा "दिमाख" हा कविता संग्रह हातात आला. त्यापुस्तकात एक ओळ होती 'या पुस्तकाला साहित्य संस्कृती मंडळाच्या कडून अनुदान मिळाले आहे ' डोळे विस्फारले गेले. लेखनी हातात घेऊन भरभर पियुषा ला पत्र लिहिले. आणि महिन्यभरात तिच्या आईचे पत्राने मिळाले. माझी पाठ थोपटत त्या म्हणाल्या "धनाजी तुझ्या सारखा गरीब मुलगा खेड्यात वाढलेला पण कविता करतो. मला आनंद वाटतो. नक्की प्रयत्न करा तुला यश मिळेल. "मी पियुषाची आई लिहिते ती आता अमेरिकेत असते. ती आता मोठी झाली आहे.खाली साहित्य संस्कृती मंडळाचा पत्ता देत आहे.मला आभाळ फक्त बोटभर ऊरले आहे बस्स आता हात टेकतील त्याला. असे वाटू लागले. त्यांनी दिलेल्या पत्त्यावर पत्र पाठवले कधीच पत्राला उत्तर न देणारे शासन पण या ठिकाणी वेगळा अनुभव आला. मला पुस्तक प्रकाशनासाठी चे नियम व अर्ज पाठविण्यात आला. झपाटून कामाला लागलो. पहिला प्रयत्न फोल ठरला.पुन्हा दुसर्या वर्षी. काही बदल करून दुसरे पुस्तक पाठविले. तेही साभार परत आले.तिसर्या वर्षी पुन्हा सर्व कविता बदल करून पुस्तक पाठविले. तब्बल एका वर्षात पत्राने कळविण्यास आले. "आपले पुस्तक प्रकाशनासाठी स्वीकारले आहे. "पुण्याच्या मधुश्री प्रकाशनाने माझा पहिला कविता संग्रह "पळसबहर " प्रकाशित केला.वर्ष होते. 2004 पण मी स्वतःच बेकार होतो.काम धंदा काही नव्हता. म्हणून कोणताही गाजावाजा न होता पुस्तक बाहेर आले. पण पत्राने वाचकांची मते कळली .खूप आनंद वाटला. कमी वयात हे मी कुणाच्या ही मदती शिवाय करू शकलो याचा अभिमान वाटतो.बेकार असल्या मुळे घरात पैसे मागायची लाज वाटायची म्हणून कार्यक्रम टाळू लागलो. म्हणून प्रसिंद्धी पासून दूर राहिलो.या क्षेत्रात तुम्ही लोकांसमोर नाही आले तर तुम्हाला कुणी ही विचारणार नाही.

       ✒श्री.धनाजी जनार्दन बुटेरे
             पोई कल्याण ठाणे
         djbutere@gmail.com
            ( c ) copyright

माझा लेखन प्रपंच (3)

                               पुढे शिवकृपेने आदिवासी विकास विभाग ठाणे. येथे प्राध्यापकाची नोकरी मिळाली. पण ती ही ठाणे जिल्ह्यातील अतीदुर्गम जव्हार तालुक्यातील विनवळ या खेडेगावात येथे जीव मरायला वेळ लागला.घरापासून प्रथम एवढ्या दूर एकटाच रहात होतो.येथे निसर्ग सुंदर आहे. पण माझ्यातील कवी ला एकटेपणा जाणवू लागला येथे कविता फुलावी तशी फुलली नाही. एकूण सात वर्षे माझे येथे वास्तव्य होते पण मोजून शंभर एक कविता लिहिल्या असतील. दोन कथा एवढे काय ते लिखाण हातून घडले.पण कविता कोमेजून दिली नाही. याच काळात 2006 रोजी आकाशवाणीवर माझा कविता वाचनाचा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून प्रसारीत करण्यात आला. पुन्हा पुढे सहा महिन्यांनी कथा कथनासाठी मुंबई केंद्रावरून बोलावण्यात आले. "कशा साठी पाण्यासाठी "ही कथा मी त्यावेळी सादर केली. पुन्हा दोन वेळा पाच पांच मिनिटांची भाषण दिले. कृतकृत्य झाल्या सारखे वाटले. हे तुमच्या साठी छोटी गोष्ट असेल पण माझ्यासाठी खूप मोठी झेप आहे. हे सारे मी स्वतःच्या जोरावर केले कुणाची ही काडीची मदत घेतली नाही. स्वयं कर्तृत्वाने सारे केले. म्हणून आनंद जास्त वाटतो. पुन्हा बदली गांवा जवळ झाली. आणि लेखनाला गती मिळाली. मनसोक्त लिहू लागलो. दरवर्षी. असंख्य दिवाळी अंकात माझे साहित्य छापून येते. असंख्य कवी संमेलनात सहभागी होतो.कविता स्पर्धेत सहभागी होतो. विजेत्यांच्या यादीत माझे नाव पाहून सुखावून जातो.नोव्हेंबर 2016 मध्ये माझी अखिल भारतीय साहित्य महामंडळाच्या कल्याण ग्रामीण शाखेचे अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. हे सारे स्वकतृत्वाने मी मिळवले धन आहे.मला कुणी गाॅडफादर लागत नाही तुमच्यात जर कर्तृत्व असेल तर तुम्हाला कुणी पुढे जाण्यापासून रोखू शकत नाही. या नंतर मी अजून एक छोटा प्रयोग केला.माझ्या कवितांचे स्वतःच्या आवाजात व्हिडीओ तयार करून युटूबवर टाकावा असं वाटू लागले म्हणजे आपली कविता जास्त लोकांपर्यंत पोहचले पण इंटरनेट विषय आमची पिढी अनभिज्ञ आहे. पण मी स्वत हे सारं केले. आणि युटूबवर माझा व्हिडीओ तयार झाला. हे फार मोठे काम नाही पण मला हे दिव्य वाटत होतं.आज माझ्या बर्याच कविता युटूबवर आहेत. हे पाहून आनंद वाटतो. लिहले खूप आहे. पण प्रकाशित झाले नाही. आज माझ्याकडे पाच सात पुस्तके तयार होतील ऐवढे साहित्य आहे. जसे जमेल तसे तुमच्या समोर पुस्तक रुपाने येईल. नाही तरी मी वेगवेगळ्या माध्यमातून आपल्या समोर येण्याचा प्रयत्न करणार आहे.तसे काही लिहावेसे वाटले तर माझा ब्लॉग वर लिहितो.djbutere@blogspot.com हा माझा ब्लॉग. येथे मी जमेल तसा लिहितो.WhatsApp वा fecebook वर मी जास्त लिहीत नाही कारण येथून साहित्य लोक मोठ्या प्रमाणात चोरतात.आणि आपल्या कविते खाली आपलेच नाव टाकायला जरा संकोच वाटतो. साहित्यातील सर्वच प्रकार मी हाताळले आहेत. कथा, कविता, ललित, एकांकिका, चारोळ्या, लेख, बालकवीता,लेखन ही माझे पहिले प्रेम आहे. मी ते करत रहाणार. आज तेवीस वर्षे झाली मी लिहीत आहे. त्यातून मला ऊर्जा मिळते.आनंद मिळतो.कोणी काय पण करो त्याचा मूळहेतू आनंद प्राप्ती हाच असतो. शेवटी एक कुणा कवी ची एक ओल आठवली. आनंद या जीवनाचा सुगंधापरी दरवळावा पाव्यातला सूर जैसा ओठांवरी ओघळावा.

        ✒ श्री.धनाजी जनार्दन बुटेरे
              पोई कल्याण ठाणे                   
             djbutere@gmail.com    
              ( c ) copyright

मराठी कविता कौर्याची सीमा


कौर्याची सीमा

क्रौर्याने गाठली सीमा
लुटली भर बाजारी.
षंढ कसे हात बांधून
आक्रोशते नारी.

धृतराष्ट ते सारे झाले
काळोख दाटे नयनात.
उघडी नारी लुटली सारी
आक्रोश भर रस्त्यात.

आळीपाळीने भोगून झाली
हरली सारीपाटात .
तरी कुणा ना लाज वाटली
लाज दडली पोटात.

घडून गेले नंतर मशाली
पेटून उठल्या घरोघरी.
कुठे जळते मेणबत्ती
काय उपयोग आता तरी.

   ✒ प्रा.श्री. धनाजी जनार्दन बुटेरे
        पोई कल्याण ठाणे
        📞 9930003930

स्त्री वादळी कविता

💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕

"वेढा "

ती आली आली,
काळी काळी रात
आणि जळून गेले,
बहरलेले शेत. ॥

ती सुंदर कांता,
सुकुमार लजवंती.
तू राणी माझी,
कैक तिला ते म्हणती.॥

परी कुणाचीच ना,
कधीच ना ती झाली.
मुखकमलावर ती,
अजून वाढते लाली. ॥

कुणी एक दैत्य,
तिजवरी टपलेला.
तो असा टपोरी,
गल्लीत हलकट मेला. ॥

तो करी अर्जव,
आणि विणवी फार.
ती सरळ देखणी ,
साधी सुकुमार. ॥

तो क्रोधाने मग,
झाला लाले लाल .
फेकले अॅसीड अन्,
विद्रूप झाले गाल. ॥

तुम्हीच सांगा गुन्हा ,
कोणता घडला.
तिजवरी भोवती ,
काळाचा वेढा पडला. ॥

            ✒ प्रा.श्री. धनाजी जनार्दन बुटेरे 
                पोई कल्याण ठाणे
                📞9930003930
     🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺

मंगळवार, २२ नोव्हेंबर, २०१६

कविता कशी तयार होते. (एक कविता )

माझी कविता

येई पावसाची सर ;
गंध मातीतून सुटे.
तशी मनाच्या गाभारी ;
कविता मज भेटे ॥

पायी बांधुनिया चाळ ;
कधी रुणुझुणु पैंजण.
माझी कविता येते ;
माझी बनून साजन. ॥

कधी दवाचा दहीवर ;
कधी पळसाचा बहर.
होते खट्याळ कविता ;
सैरभैर अंगभर. ॥

कधी कान्हाची बासरी ;
कधी कंचुकीची गाठ.
माझी कविता दाविते ;
कधी रुसुनिया पाठ ॥

कधी दीनाची झोपडी ;
कधी महालाची दाशी.
कधी रांगत रांगत ;
माझी कविता दाराशी. ॥

कधी सूर्य होऊनिया ;
क्षितीज कवे घेते.
कधी स्फुंदत रुसत ;
कविता साज लेते . ॥

फुलपाखरा सारखी.
भिर्रभिर्रते रानात.
दारी कोकीळा गाते.
माझ्या कविता मनांत. ॥

कधी पाऊस रानचा ;
कधी शेतातला भात.
माझी कविता येतिया
ओठातून गात गात. ॥

                   ✒ प्रा.श्री.धनाजी जनार्दन बुटेरे
                       पोई ; कल्याण; ठाणे.   
                     djbutere@blogspot.com
                          (C) :- Copyright

रविवार, २० नोव्हेंबर, २०१६

आकाशवाणीने भारावलेले दिवस ( भाग एक )

                              तो कालच तसा होता.तेव्हा करमणुकीसाठी आजच्या सारखी वेगवेगळ्या प्रकारची माध्यमे नव्हती. विटीदांडू.सुरपारंब्या,पोहणं, गोटया,झालंच तर एखाद्या चिंध्याच्या पासून तयार केलेल्या चेंडूने आबाधबी खेळायची,आबाधबी म्हणजे काय ?असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तर चिंध्याच्या चेंडू ने एकमेकांना मनसोक्त बडवणे."चोर पोलीस हा एक खेळ आवडीने खेळायचा .एकूण काय ? तर बिनभांडवलाचे सर्व खेळ खेळले जायचे.जोडीला कुस्ती, कबड्डी होतेच. तर हे सारे खेळ आम्हा मुलांचे मनोरंजन करायचे.तेंव्हा क्रिकेट कशा बरोबर काय खातात एवढं माहीत नव्हते. या मातीतील खेळ खेळून च आमुची पिढी मोठी झाली. म्हणूनच आमचं आणि या मातीचे नाते घट्ट आहे. त्यावेळी शाळेतपण भारतीय पध्दतीचे खेळ शिकविले जायचे. शाळा सुटली की बच्चेकंपनी मातीतल्या खेळात रामायची.त्यावेळी पालक ही आजच्या सारख्या मुलांनी नव्वद टक्के च पाडले पाहिजेत अशा खोट्या अपेक्षा बालगत नव्हते. आणि म्हणून आमची पिढी रांगडी होती. अशा परीस्थितीत वाढलेला मी पण मी या खेळात जास्त रमलोच नाही. कारण माझं भावविश्व वेगळे होते. लहान मुलांनी रमावे अशी ठिकाणे फारच कमी.आमच्या लहानपणी आताच टिव्ही गावात आला होता.करमणुकीचे दुसरे साधन म्हणजे " रेडिओ "गावात मोजून पाच सहा रेडिओ असतील. रेडिओ ऐकने हा माझा सर्वात आवडता छंद. आजही एखादे गाणं लागले तर त्या गाण्यांचा कवी ,संगीतकार, चित्रपट, गायक ,माझे तोंडपाठ आहेत. असा हा रेडिओ माझा सखा झाला होता.रेडिओ ऐकता ऐकता मला एक त्यात आनंदाचे ठिकाण सापडले.आकाशवाणी मुंबई केंद्रावर त्यावेळी अनेक पत्रउत्तराचे कार्यक्रम व्हायचे त्या कार्यक्रमात श्रोत्यांच्या प्रश्नांची उत्तरे श्रोत्यांचे नाव व पत्ता सांगून दिले जायचे. मला याचे फार अप्रुप वाटे .आपलं ही नाव असे येईल काय ? या कुतूहला पोटी पाच सहा पत्र आकाशवाणीला लिहीली प्रथम थोडे अपयश आले पण ओढ स्वस्थ बसून देईना पुन्हा पाच सहा पत्र पाठविले आणि एका दिवस माझं आख्खे पत्र वाचून दाखवण्यात आले.त्या दिवशी स्वर्ग फक्त दोन बोटावर उरले होते. मग पत्रलेखन हा माझा छंद च बनला. आकाशवाणीवर असा एकही कार्यक्रम नसेल ज्यात माझं पत्र आले नसेल. महिन्याला पंचवीस तीस पत्र लिहायचो त्यातील पंधरा सोळा पत्र वाचून दाखवली जायची.मला खाऊसाठी मिळालेले पैसे मी पोस्ट कार्डं विकत घ्यायला वापरायचो.हळूहळू मला लोकं विचारून लागली आजुबाजुच्या गावातील एखादा माणूस माझी चौकशी करायचा खूप बरे वाटायचे.मग मोर्चा हळूहळू विविध भारती, पुणे आकाशवाणी केंद्रावर वळविला .या केंद्रावर माझी पत्र येऊन लागली. "आपली आवड" "कामगार सभा" "युववाणी" "सखी" "माझं आवारा माझं शिवार" "बालदरबार" "गंमत जमंत" हे सर्व कार्यक्रम माझे आवडते झाले होते .या सारख्या कार्यक्रमात मी पत्रे लेखन सातत्याने करत होतो.आकाशवाणी मुंबई केंद्रावर माझी एका वेगळी पत्र लेखक म्हणून मी ओळख तयार केली होती. ती म्हणजे " माझ्या हातात सुंदर हस्ताक्षरातील पत्र आपले नेहमीचे पत्रलेखक"...असं उदघोषकाने म्हटले म्हणजे पत्र माझंच वाचलेले जायचे.हा एक वेगळा आनंद होता. इयत्ता आठवी पासून लागलेला हा छंद पुढे बी.ए.झालो तरीही होताच. पुढे हा छंद सुटला; कसा ते नाही आठवत.आपलं पत्र कार्यक्रमात वाचलं जावं म्हणून तेव्हा कल्पकतेने लिहू लागलो.नवीन कल्पना वापरू लागलो. "बालदरबार" लहानपणी फार आवडायचा तो आठवड्याला रविवारी एकदाच असे म्हणून मी वाट पहायचो कारण त्यामध्ये बालकथा कविता सादर केल्या जायच्या. मला कविता आवडतात त्या त्यावेळेस पासून. या कार्यक्रमात मी लहान मुलांनासाठी छोट्या छोट्या कविता पत्राने पाठवायचो कधी कधी कविता वाचून दाखवली जायची तेव्हा काय आनंद व्हायचा शब्दात नाही. मांडता येणार. रेडिओ ऐकून विचारांची बैठक पक्की झाली. त्यामुळे आकाशवाणी नेहमी जाहीर केलेल्या विविध लेखन स्पर्धेत मी भाग घेऊ लागलो त्यातून बक्षिस मिळत गेली आणि माझ्या छंदाला अर्थांजन होवू लागले.त्यातून आत्मविश्वास वाढला.आणि वेगवेगळ्या आकाशवाणी वर होणा-या स्पर्धेत भाग घेऊन लागलो.पण मला लेखनाचा छंद जडला एवढंच मात्र नक्की. (भाग 2 पुढील पानावर)
         ✒प्रा.श्री. धनजी जनार्दन बुटेरे
                  मु.पोई,कल्याण;ठाणे
                   📞9930003930

आकाशवाणी ने भारावलेले दिवस (भाग दोन)

                       आकाशवाणीवर वाचून दाखवलेल्या पत्राची नोंद ठेवणे हा अजून एक छंद किती पत्र आकाशाकडे पाठवली किती कार्यक्रमात सामिल केली याची इत्यंभूत माहिती मी साठविली आहे.सहाशे च्या वर पत्र आकाशवाणीने विविध कार्यक्रमात सामिल केली हे ही नसेल थोडके. कदाचित मी लेखक कवी होण्यामागे आकाशवाणीचेच फार मोठे योगदान आहे. नंतर पत्र लेखना पासून दूर गेलो. पण लेखनाची उर्मी कायम राहिली. त्याच छंदाने मला लिहिते केले. मग वर्तमानपत्रात पत्र लेखन व छोटेमोठे लेखन ललित लिहायचा छंद जडला .काॅलेज मध्ये मराठीतून एम.ए.करत होतो.दरम्यानच्या काळात कविता लेखनाचा नाद लागला.मग माझी सखी आकाशवाणी आठवली या वेळी पुन्हा आकाशवाणीने हातात हात दिला.आणि एका दूरवर खेड्यातला मुलगा मी आकाशवाणीवर काव्यवाचनासाठी मुंबई आकाशवाणीवर गेलो.नवख्या कवीच्या कविता लोकांना खूप आवडल्या पत्रउत्तराच्या कार्यक्रमातून हे कळलं. पुढे आकाशवाणीवर दोन तीन काव्य वाचनाचे कार्यक्रम केले.कथाकथनाचे कार्यक्रम झाले. आकाशवाणी वर वेळोवेळी जाता राहिलो.परीसर या कार्यक्रमत भाषणं देऊ लागलो.मी फार मोठा साहित्यिक नाही पण आकाशवाणीनेहमी माझे छंद पुरविले हे मात्र खरे. आज टिव्ही वाहिन्यांच्या भाऊगर्दीत मी.व्हाट्सअपच्या ,फेसबुक ट्यूटरच्या जमान्यात माझ्या प्रिय सुखीला आकाशवाणीला मी पुरता विसरता चाललोय हे मात्र सोळाआणे खरे.माणूस किती कृतघ्न असतो याचे हे उत्तम उदाहरण. ज्या रेडिओवर मी तासनतास खुर्ची घालवयचो तिकडे ढुंकूनही न पहाणे या पेक्षा ती बेवफाई कोणतीही? पुन्हा तुझ्याकडे वळायचे असं आता मी ठरवलंय पाहू जमतय का? व्हाट्सअपची फेसबुकची मगर मिठी सुटते का? जरा सुटली तर सखे पुन्हा मी तुझाच होईन.

        ✒  प्रा.श्री धनजी जनार्दन बुटेरे
               मुंबई.पोई,पोस्ट वाहोली                    ता.कल्याण ,जिथे.ठाणे
               📞  9930003930    
                 Copyright