बुधवार, ३ ऑगस्ट, २०२२
ऋतुराज श्रावण
सृष्टीचा मैतर ऋतुराज श्रावण
श्रावण म्हणजे रंगाचा सण.रानफुले नुकतीच वर डोकावून पहायला लागलेली असतात.वेली फुलांनी लगडलेल्या असतात.आकाशात छान इंद्रधनुष्याची कमान, जणू क्षितिजावर कुणी तोरणच बाधल्याच भास होतो,रानफुलांनी मालोरान बहरलेले असते.ऊन पावसाचा पाठशिवणीचा खेळ रंगात आलेला असतो.सभोवताल भातशेती गर्वाने डोलत असते.रानपाखरांचे थवेच्या थवे,मस्त फांदीवर झोके घेत गात असतात.डोंगरावर शुभ्र रंगी खट्याळ झरे,मंजुळ गाणे गात घाईघाईत नदीकडे झेपावत असतात.कड्यावरून कोसळणारे शुभ्र पाणी जणू दूधगंगाच!इतक्या कुणी चुकारपक्षी,निर्मळ पाण्यात मस्त शीळ घुमवत खडकावर ऐटीत बसलेला दिसतो.आकाशात क्षणात शामल कोमल ढग जमा होतात.त्यांनाही हा श्रावण सोहळ्यात सामिल व्हायला वाटते.क्षणात ते बरसतात.आणि मोकळे होतात.उरते फक्त कापसा सारखे शुभ्र धुक्यासारखे ढग.सरी गडप होतात आणि लगेच सूर्य नारायणाचे दर्शन होते.झाडा झाडावर चंदेरी वर्ख चढतो.ते चकाकणारी पाने.नव्हे झाडावरचे सोने.पहाणारा हरखून जातो.सारी सृष्टीच नवीकोरी भासू लागते. पसरते.
मालावर मऊशार लुसलुशीत गवतात.बैल वर शेपटी करून चरत असतात.गुराखी मुले कुठे तरी पाण्यात दंग झालेले असतात.हिरव्या कुरणावर चरणारी गाय,आपल्या वासराला मस्त चाटत असते.वात्सल्य आणि ममता.ओसंडून वाहत असते.सारी सृष्टीत चैतन्य भरले जाते.
जसा हा सृष्टीचा सोहळा साजर होत असतो;तसा मानवी मनाला आनंद देणारा हा श्रावण. किती तरी सणांची लगबग पहायला मिळते श्रावणात.नागपंचमीला नटणा-या मुली, झोके घेत छान गात असतात.पंचमी सरते न सरते.लगेच येतो दर्याचा सण,कोळी बांधव दर्याला सोन्याचा नारळ अर्पण करून नारळीपौर्णिमा आनंदाने साजरी करतात.नाचत,गात मासेमारीला बोटी पुन्हा दर्यात सोडतात.बहिण भावाच्या नात्याचा निख्खल सोहळा.म्हणजे रक्षाबंधन याच दिवशी असतो.सा-या माहेरवाशीण आपल्या माहेरी जमा होतात.बालपणीच्या मैत्रिणीची गाठभेट होते.मग काय तो आनंद.माहेरवाशीण पोरींची
गावभर हिच एक लगबग पहायला मिळते.
दर सोमवारी शिवमंदिरात होणारी गर्दी आणि वाहिली जाणारी शीवमूठ, मंदिरात गर्दी ओसंडून वाहत असते.हा उत्सव दर सोमवारी चालतो.कृष्ण जन्माचा उपवास जन्माष्टमी घेऊन येतो,घराघरात बालकृष्ण जन्म घेतो.रात्री सुंठवडा वाटलो जातो.बालकृष्ण पाळण्यात घालून लाडाकौतुकाने गोविंद घ्या कुणी गोपाल घ्या. होते.तरूणी,नवववाहिता आनंदाने नाचतात.दुस-या दिवशी रंगतो.तो गोपालकाला.दहीहंडीत बेभान होणारे तरूण.रात्री घराघरात वाचल्या जाणा-या पोथ्या.आणि पोळ्याला बलीराजा आपले गोधन पूजन करून गावात मिरवणूक काढतो.लेझीम,ढोल,हलगी ताशे सणाणतात.कडकड करत हलगी वाजते,तरूण धुंद होऊन नाचतात.आणि हा श्रावण मग आपल्याला अलविदा करतो.एकूणच हा मास म्हणजे व्रतवैकल्ये,मंगल,आणि पवित्र मास.
असा हा श्रावण म्हणजे आनंद आणि उत्सव घेऊन येणारा ऋतुराज ,सा-यांच या श्रावणाची प्रतिक्षा असते.मनामनात घर करणारा हा श्रावण कधी सरूच नये.अस्सच वाटते.
श्री.धनाजी जनार्दन बुटेरे
कल्याण ठाणे.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा