कवी श्री धनाजी जनार्दन बुटेरे आपले शब्दांचा गुलमोहर अनुदिनी वर आपले स्वागत करीत आहे सर्व कविता, लेख, कथा याचे स्वामीत्व हक्क राखून ठेवले आहेत.

मंगळवार, २४ एप्रिल, २०१८

जन्म (कविता )

जनम

माय खोपटा बाहेर.
नाही वावरात कुणी.
चीटपाखरू नाही
माय शोधतेया पाणी.

लाल जमीन तापली.
पाय नाही धरी थारा.
कुठे मिळतया पाणी ?
माझ्या मायेला इचारा.

सूर्य रुसून बसला.
नाही घोटभर पाणी.
वेचावया चार थेंब
माय विसरली गाणी.

चाले दिसामाजी दिस
डोइवर  रिता घट
तिच्या ललाटाची रेषा
नशीबात रटरट

किती गेले सुके दिस
माय तुडवते रान.
घोटभर पाण्यासाठी
माय झालीया हैराण.

सारे आभाळ दाटते
तिच्या डोळ्यामधे दाटी.
माय जनम सरला.
थेंब भर पाण्यासाठी.

श्री धनाजी जनार्दन बुटेरे
पोई.ता.कल्याण जि.ठाणे

मंगळवार, १० एप्रिल, २०१८

प्रेमकळा


प्रेमकळा

लिहावी तुझ्यावर कविता
तर मनात उठतो
आठवणींचा आगडोंब,
भावनांचा कल्लोळ,
आणि मनाची तगमग.
आता नाही झेपत प्रिये
त्या प्रेमकळा.
नको वाटतो तो भूतकाळ.
नाही सोसत ते पुन्हा,
"रक्तबंबाळ होणे".
नको ते क्षण जीवघेणे 
मी वाचतो आठवणी पुस्तक
तेव्हा विराहाचे क्षण
ठळक होतात.
नि जमतोय आसवांचा,
गोतावळा संगत करायला.
आणि मन लागतं झुरायला.
आता नको वाटतं झुरायला
पुन्हा पुनः मरायला.

श्री. धनाजी जनार्दन बुटेरे
कल्याण ठाणे

मंगळवार, ३ एप्रिल, २०१८

ऋतू कोणता तो ?

प्रेम कविता

ऋतू कोणता तो

तुला पहाता मी
मोहरून जातो.
ऋतू कोणता तो
मला महवितो.

फुललीस अशी की ;
गुलमोहर लाजे.
ऋतू कोणता ग
मज बोलवितो.

वाटते जरा
बाहुपाशात यावी.
ऋतू कोणता
मला खुणवितो.

सांडल्या अशा
पाकल्या यौवनाच्या.
ऋतू कोणता तो.
मला गंध देतो.

तुझे पहाणे
भास तो मोग-याचा.
ऋतू कोणता तो
मिठी सोडवितो.

*प्रा.श्री. धनाजी जनार्दन बुटेरे*
*कल्याण ठाणे*
30/3/18 शुक्रवार शहापूर

बुधवार, २८ मार्च, २०१८

पोटासाठी काय पण. ...!

कविता

पोटासाठी  काय पण..!

तिच्या भारदस्त शरीरावर,
गिधाडांची झुंबड उडायची.
आणि अख्खी रात्र गिधाडे,
तिच्या नशेत बुडायची.
कुणी थेरडा, कुणी रोगी,
कुणी बेवडा,कुणी जोगी
येणारा प्रत्येक जण,
तिला भोगी.
ती करायची सारं,
गप्प गुमान.
ती पोसायची आपल्या,
जवानीवर हुमान.
लोक मौजमस्ती म्हणून
करतात सेक्स.
ती पोटाची खळगी भरावी.
म्हणून करते सेक्स.
घरी दोन चिल्लीपिल्ली,
वाट पहात असतात.
वाटेकडे डोळे लावून बसतात.
लोकांचा शीण घालवून
ती घरी येते.
स्वतःच शीणलेली.
गरिबी ची झालर,
पहा कशी विणलेली.
ती विकते शरीर.
पोटभरावं म्हणून .
कुणाचा आधार नसला ;
की ती जाते वेश्या बनून.
आपण म्हणतो तिला
रांड रंडी छिन्नाल.
वगैरे वगैरे. ...

========================

प्रा.श्री.धनाजी जनार्दन बुटेरे
     कल्याण ठाणे

शनिवार, ९ डिसेंबर, २०१७

सामर्थ्य आहे चळवळींचे

                          विविध क्षेत्रांतील चळवळीनी नेमकी  काय केले?"सामर्थ्य आहे चळवळींचे जो जे करील तयांचे ."असे संत रामदास स्वामी म्हणतात.खरोखरच चळवळी मध्ये सामर्थ्य आहे.आज असंख्य वेगवेगळ्या क्षेत्रामधे. आपल्या न्याय व हक्कासाठी तसेच समाज उत्थान. घडविणा-या चळवळी उभ्या आहेत. त्या किती प्रमाणात स्वतःशी प्रामाणिक आहेत या यक्ष प्रश्न आहे. जेंव्हा चळवळ उभी रहाते उद्देश फार प्रामाणिक असतो. पण नंतर चळवळ वेग घेऊ लागली की चळवळेतील नेते मंडळी सरकार च्या दावणीला बांधले जातात,किंवा विकले तरी जातात .चळवळ उरते नावा पुरती.शरद जोशींची शेतकरी वर्गाच्या हितासाठी शेतकरी संघटनेची बांधणी केली.तिचा परिणाम ही दिसू लागला.पण कुठे पाल चुकचूकली कुणास ठाऊक? .नवीन संघटना तयार झाल्या नि चळवळ पुढे सरकू शकली नाही. खरे तर सर्वात असंघटीत घटक म्हणजे शेतकरी. असंख्य मागण्या आहेत त्याची ही गरज आहे. पण शेतकरी एकसंघ राहू शकला नाही. परिणामतः सरकायचं फावलं नि शेतकरी देशोधडीला लावलं.कामगार हितासाठी संघटना हवीच पण असंख्य संघटना त्यामुळे कामगार आजही असंख्य मागण्या पासून उपेक्षित आहे. काही कामगार नेते सरकारचे मांडलिक झाले. आणि चळवळीची वाट लागली. आज सरकार विरोधात निघणारे मोर्चे कष्टकरी वर्गात किती असंतोष आहे. हे संगतात.
             विद्यार्थी चळवळ अपेक्षित यशस्वी झाल्या नाहीत. या चळवळी राजकीय पक्षांचे स्टॅप घेऊन. उतरू लागल्या. परिणामतः विद्यार्थी चळवळ ही हवी त्या गतीने पुढे जाऊ शकली नाही. प्रस्थापित सरकार विरुद्ध विद्यार्थी असाच संघर्ष पाहायला मिळतो .त्यात विद्यार्थी राजकीय झेंडे घेऊन उतरले."विरोधासाठी विरोध.की गरजेसाठी विरोध." हे एक कोडे आहे.राजकारणी विद्यार्थ्यांचा अपमतलब म्हणून वापरू लागले.
               साहित्यात  ही चळवळी आल्या. जाती धर्मानुसार पुढे प्रवाह वाढले.प्रांतिय स्वरूप प्राप्त झाले. मग पुन्हा. विदर्भ, मराठवाडा, कोकण,यामध्ये वेगवेगळे गटतट तयार झाले.खरे तर साहित्य चळवळी वाढणे म्हणजे समाज उत्थान घडविणे हा मुख्य उद्देश होता. त्यातून वैश्विक साहित्याची निर्मिती व्हावी.जनमानसात साहित्याची चर्चा व्हायला हवी पण तसे होताना दिसत नाही. काही साहित्य चळवळी केवळ नावापुरत्या आहेत. काही पुरस्कार देण्यापुरत्या बरं पुरस्कार लायक साहित्यिकाला द्यावा पण येथे वशिल्याने पुरस्कार वाटले जातात. काही चक्क विकतात.नि दस्तूरखुद्द आमचा साहित्यिक ते पुरस्कार विकत घेतात सुध्दा. काही साहित्यिक संस्था आपल्या जवळच्या साहित्यिकाला पुरस्कार वाटतात.तू ओळखिचा तू जवळचा असे पुरस्कार स्वतःची आणि चळवळीची हानी करून घेतात.चळवळीचा उद्देश दूर रहातो नि चळवळ वांझोटीच रहाते.
                       मराठी माणसांच्या हक्कासाठी शिवसेना ही राजकीय चळवळ उदयास आली. काही अंशी मराठी माणसांना ती आपली वाटली.पण चळवळीचा हवा तसा मराठी माणसांनी हात दिला नाही. त्यातून ही राजकीय चळवळ.कुणाला रुचली.कुणाला पचली नाही.राजकीय चळवळ त्यामुळे सगळ्या मराठी माणसांचा पाठींबा लाभला नाही. आणिआपणा सर्वांना महीत आहेच पुढे काय झाले? त्या ही पुढे महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही राजकीय चळवळ मराठी माणसांच्या हक्कासाठी नवीन पक्ष म्हणून उभी राहिली.येथे ही मराठी माणूस या चळवळी पासून दूर गेला.राज ठाकरे या मराठी माणसांला ऐकायला लोक लाखोच्या संख्येने येतात पण मतपेटी मात्र रिकामी रहाते.येथे राज ठाकरेंना मत दिले म्हणजे चळवळ यशस्वी झाली असं मला म्हणायचे नाही. तर किती मराठी अस्मितेचे प्रश्न सुटतात या वर या चळवळीचे यशापयश अवलंबून आहे.
                    थोडक्यात काय चळवळींचे यशापयश. त्यात काम करण्या-या कार्यकर्त्यांच्या हातात आहे.पुरस्कारा.दिल्याने ती संस्था मोठी होत नाही. तर ती व्यक्ति त्या संस्थेला मोठी करते. दिडदमडीला जे कामगार नेते विकले जातात. त्या कामगार चळवळींचे भविष्य अंधःकारमयच .खरी सचोटी नि प्रामाणिकपणा हा चळवळींचा आत्मा असतो.आणि हे जर चळवळीतील कार्यकर्त्यांकडे नसेल तर चळवळ वांझोटीच. म्हणून आम्हाला आजच्या चळवळी काहीच देऊ शकल्या नाही हे माझे प्रामाणिक मत आहे.

प्रा.श्री.धनाजी जनार्दन बुटेरे
मु. :--पोई, पो. :-- वाहोली.
ता. :--कल्याण,जि.ठाणे.

शुक्रवार, २९ सप्टेंबर, २०१७

हे ऐकून मातृभूमी



हे ऐक मातृभूमी

ते तुझ्याचसाठी लढले
ते तुझ्याच साठी घडले
ते धारातिर्थी पडले.
हे ऐक मातृभूमी. .

सोडले माय ते बंध
मनी ध्यास तुझा तो छंद
उठले कराया बंड
हे ऐक मातृभूमी.

डोळ्यात त्यांच्या पाणी
ते तुझीच गाती गाणी.
फासावर जातो कोणी.
हे ऐक मातृभूमी.

इनक्लाब होता नारा.
रक्ताच्या वाहिल्या धारा.
आता नाही तयांचा पहारा.
हे ऐक मातृभूमी.

आवळला फाशीचा दोरं
लढले थेथील विर
पाठीशी होते थोर.
हे ऐक मातृभूमी.

तुम्ही स्मरा त्यांची स्मृती
मग येई तुम्हाला स्फूर्ती
ही पावन होईल  धरती
हे ऐक मातृभूमी.

=============================

प्रा श्री धनाजी जनार्दन बुटेरे
मु.पोई पो. वाहोली.
ता. कल्याण ठाणे
421103
फोन 9930003930
What,a app.9404608836

==============================


बुधवार, २७ सप्टेंबर, २०१७

कवडीमोल

कवडीमोल

धनी राबतो कष्टतो,
तरी पोटभर नाही.
किती गाळतोया घाम,
सारे महागाई खाई. ॥

कसं जगावं गरिबांनी,
पोट जाळत जाळत.
जगतोया कसाबसा,
आसू ढाळत ढाळत. ॥

राब राबतो शेतात,
महागाई करी स्वाहा.
अरं येड्या सरकारा,
एक येळ तरी पहा.॥

धनी जगाचा पोशिंदा,
पिकवतो दौलत.
जवा बाजारात उभा,
त्याची वंगाळ हालत.॥

माझ्या धन्याची दौलत,
शेतीमाळ कवडीमोल.
सारी कडे महागाई,
दुःख काळजात खोल.॥

प्रा श्री धनाजी जनार्दन बुटेरे
मु.पोई ,पो.वाहोली,
ता.कल्याण, जि.ठाणे,
फोन. 9930003930