कवी श्री धनाजी जनार्दन बुटेरे आपले शब्दांचा गुलमोहर अनुदिनी वर आपले स्वागत करीत आहे सर्व कविता, लेख, कथा याचे स्वामीत्व हक्क राखून ठेवले आहेत.

सोमवार, २५ जून, २०१८

प्लास्टिक बंदीआणि रोजगाराची संधी

प्लास्टिक बंदी आणि रोजगाराची संधी

             दि 23 जून पासून राज्य सरकारने प्लास्टिकच्या पिशव्या व थरमाकोलवर बंदी आणली आहे.आणि राज्यभरातून वेगवेगळ्या स्तरातून अनुकूल, प्रतिकूल आशा प्रतिक्रिया येत आहेत. पण व्यवसायिक व दुकानदार वगळता सर्वसामान्य माणूस प्लास्टिक बंदीचे स्वागत करताना दिसतो आहे.खरंतर आपणा सर्वांना स्वागत करण्यासारखी बाब आहे. सर्वच व्यापारी मंडळी आता आमचे कसे होणार ? म्हणून उर कुटताना दिसतात. पण पंधरा सोळा वर्षापूर्वी काय होते ? जरा आठवा ?.दूधवाला भांड्यात दूध घालायचा.आपण तेल आणायला घरून बाटली किंवा डबा नेत होतो.बाजारात जाताना पिशवी न चुकता नेत होतो.मग प्लास्टिक आले नि माणसाला आळशी बनविले.आता लगेच आपल्या ला गैरसोय होऊ लागली. पण आपण रहातो.पृथ्वीचे काय ? त्या परीसराचे काय ? हा प्रश्न कुणालाच पडू नये.
         जरा नद्यांकडे पहा. सागर किनारे पहा.तुंबलेली गटारे पहा. आणि शहरापासून थोड्या लांब अंतरावर असलेले डंपिंग ग्राऊंड पहा.सारे बकालवाने.गावापासून शहरात पर्यंत किळस आणणारे चित्र केवळ आणि केवळ प्लास्टिकमुळे.पर्यावरणाच्या मुळावर उठलेले हे प्लास्टिक मुळासकट उपटायला हवे.यासाठी धोरनात्मक निर्णय घ्यायला हवेत. प्लास्टिकच्या कारखान्यांच्या मुळावर घाव घालायला हवेत.प्लास्टिक निर्माण करणारे कारखाने बंद व्हायला हवे आहेत. नाहीतर प्लास्टिकचा पण गुटखाबंदी व्हायला वेळ लागणार नाही. गुजरात मधून गुटख्या प्रमाणे प्लास्टिक येत राहील. गुटखाबंदी नंतर सरकारचे अबकारी कर बुडले. पण रेल्वे स्टेशन,बस स्थानकावर पिचका-यांनी रंगविलेल्या भिंतीची संख्या कमी झाली. स्वच्छ  स्टेशन,बस थांबे दिसायला लागले.आता          गुटखा येतो. तो गुजरात मधून. तसे शेजारच्या राज्यभरातून प्लास्टिक येईल  म्हणून खबरदारी घ्यायला हवी. आणि प्रशासनाने धडक कारवाई करावी.धाक आणि जबर असल्या शिवाय भारतीय कोणतीच गोष्ट स्वीकारत नाही. हा इतिहास आहे.
          दुसरी फार मोठी जमेची बाजू म्हणजे. प्लास्टिक आणि थरमकोल  बंदीमुळे थरमकोलची ग्लास आणि लग्नात  आणि मोठ्या कार्यक्रमात वापरली जाणारी ताटं बंद होणार आहेत. त्यामुळे पळसाच्या पानांच्या पत्रावलीला सुगीचे दिवस येणार आहेत. ही पळसाचीपाने जंगलात मिळतात. आणि ही जमा करणारे सर्वच कामगार खेड्यातील आहेत. म्हणजे खेड्यातील लघुउद्योगाला चालना मिळणार आहे. विशेषतः ही पानं जमा करणारे आदिवासी आहेत.तेव्हा. त्यांच्या हाताला काम मिळणार आहे. पत्रावळ्या करण्याचे उद्योगाला चालना मिळणार आहे.   बचतगटांना काम मिळणार आहे. मातीचे ग्लास " कुल्हड " बनवणारे कुंभार यांना काम मिळणार आहे. थोडक्यात काय? तर ग्रामीण अर्थव्यवस्था बळकट होणार आहे. आणि सगळ्यांत महत्त्वाचे. पर्यावरणाचे रक्षण होणार आहे.
        तिसरी गोष्ट प्लास्टिक पिशवीला पर्याय हा कागद किंवा कापडी पिशवी असणार आहे.त्यामुळे रद्दी वर्तमानपत्रांचा पुनर्वापर       पिशव्यांसाठी होणार आहे.किंवा पिशव्यांसाठी जुन्या साड्या पुन्हा वापरात येण्याची संधी आहे. म्हणजे त्याही कापडाचा पुन्हा वापर होणार आहे. म्हणजे शिंपी उद्योगाला चालना अपेक्षित आहे.शिवाय कागदाचा लगदा तयार करण्यासाठी जी झाडे तोडली जातात.काही प्रमाणात त्यावर अंकूश लागणार आहे. म्हणजे पर्यायाने पर्यावरणाचे हीत साधले जाणार आहे.
          आणि या सर्वांत महत्त्वाचा म्हणजे. या वापरात येणा-या वस्तू पर्यावरण पूरक आहे. म्हणजे "इको फ्रेंडली" आहेत.परंतु अडचण आहे. ती जनतेच्या पाठींब्याची आणि सरकारी यंत्रणेची दोघांनी जर योग्य ती पावले उचलली तर.सुंदर शहरे,स्वच्छ गांव,समृद्ध नदी आणि हवेहवेसे समुद्र किनारे पहायला मिळणार आहेत.तेव्हा लोकहो आपण स्वागत करू या प्लास्टिकच्या बंदीचे.
प्रा.श्री धनाजी जनार्दन बुटेरे
मु.पोई,कल्याण ठाणे

शुक्रवार, ११ मे, २०१८

मराठी कविता (दिवा)

   दिवा

नाही विसरली कधी
सूर्य देवा तुला आई.
तिच्या दुःखाचा विसर
तुझ्या प्रकाशाच्या ठायी.

तू पेरीत प्रकाश
वर डोकावून येतो.
माझ्या आईच्या हातात
देवा तुझा भास होतो.

तुझे हसणे हसणे
तिच्या ललाटाची रेषा
हात जोडून सांगते.
यावे यावे माझ्या देशा

तुझा पाहुणा प्रकाश
माझं अंगण उजाळी.
मग आईच्या शब्दात
काय येतसे झलाळी.

झुंजूमुंजू सारे होता
आई गहीवरून येते.
तुझे स्वागत करण्या,
आई पहाटच होते.

प्रा श्री धनाजी जनार्दन बुटेरे
मु.पोई पो. वाहोली.
ता. कल्याण ठाणे
421103

मंगळवार, २४ एप्रिल, २०१८

जन्म (कविता )

जनम

माय खोपटा बाहेर.
नाही वावरात कुणी.
चीटपाखरू नाही
माय शोधतेया पाणी.

लाल जमीन तापली.
पाय नाही धरी थारा.
कुठे मिळतया पाणी ?
माझ्या मायेला इचारा.

सूर्य रुसून बसला.
नाही घोटभर पाणी.
वेचावया चार थेंब
माय विसरली गाणी.

चाले दिसामाजी दिस
डोइवर  रिता घट
तिच्या ललाटाची रेषा
नशीबात रटरट

किती गेले सुके दिस
माय तुडवते रान.
घोटभर पाण्यासाठी
माय झालीया हैराण.

सारे आभाळ दाटते
तिच्या डोळ्यामधे दाटी.
माय जनम सरला.
थेंब भर पाण्यासाठी.

श्री धनाजी जनार्दन बुटेरे
पोई.ता.कल्याण जि.ठाणे

मंगळवार, १० एप्रिल, २०१८

प्रेमकळा


प्रेमकळा

लिहावी तुझ्यावर कविता
तर मनात उठतो
आठवणींचा आगडोंब,
भावनांचा कल्लोळ,
आणि मनाची तगमग.
आता नाही झेपत प्रिये
त्या प्रेमकळा.
नको वाटतो तो भूतकाळ.
नाही सोसत ते पुन्हा,
"रक्तबंबाळ होणे".
नको ते क्षण जीवघेणे 
मी वाचतो आठवणी पुस्तक
तेव्हा विराहाचे क्षण
ठळक होतात.
नि जमतोय आसवांचा,
गोतावळा संगत करायला.
आणि मन लागतं झुरायला.
आता नको वाटतं झुरायला
पुन्हा पुनः मरायला.

श्री. धनाजी जनार्दन बुटेरे
कल्याण ठाणे

मंगळवार, ३ एप्रिल, २०१८

ऋतू कोणता तो ?

प्रेम कविता

ऋतू कोणता तो

तुला पहाता मी
मोहरून जातो.
ऋतू कोणता तो
मला महवितो.

फुललीस अशी की ;
गुलमोहर लाजे.
ऋतू कोणता ग
मज बोलवितो.

वाटते जरा
बाहुपाशात यावी.
ऋतू कोणता
मला खुणवितो.

सांडल्या अशा
पाकल्या यौवनाच्या.
ऋतू कोणता तो.
मला गंध देतो.

तुझे पहाणे
भास तो मोग-याचा.
ऋतू कोणता तो
मिठी सोडवितो.

*प्रा.श्री. धनाजी जनार्दन बुटेरे*
*कल्याण ठाणे*
30/3/18 शुक्रवार शहापूर

बुधवार, २८ मार्च, २०१८

पोटासाठी काय पण. ...!

कविता

पोटासाठी  काय पण..!

तिच्या भारदस्त शरीरावर,
गिधाडांची झुंबड उडायची.
आणि अख्खी रात्र गिधाडे,
तिच्या नशेत बुडायची.
कुणी थेरडा, कुणी रोगी,
कुणी बेवडा,कुणी जोगी
येणारा प्रत्येक जण,
तिला भोगी.
ती करायची सारं,
गप्प गुमान.
ती पोसायची आपल्या,
जवानीवर हुमान.
लोक मौजमस्ती म्हणून
करतात सेक्स.
ती पोटाची खळगी भरावी.
म्हणून करते सेक्स.
घरी दोन चिल्लीपिल्ली,
वाट पहात असतात.
वाटेकडे डोळे लावून बसतात.
लोकांचा शीण घालवून
ती घरी येते.
स्वतःच शीणलेली.
गरिबी ची झालर,
पहा कशी विणलेली.
ती विकते शरीर.
पोटभरावं म्हणून .
कुणाचा आधार नसला ;
की ती जाते वेश्या बनून.
आपण म्हणतो तिला
रांड रंडी छिन्नाल.
वगैरे वगैरे. ...

========================

प्रा.श्री.धनाजी जनार्दन बुटेरे
     कल्याण ठाणे