कवी श्री धनाजी जनार्दन बुटेरे आपले शब्दांचा गुलमोहर अनुदिनी वर आपले स्वागत करीत आहे सर्व कविता, लेख, कथा याचे स्वामीत्व हक्क राखून ठेवले आहेत.

बुधवार, ८ फेब्रुवारी, २०१७

प्रिय आई

प्रिय आई
       आई तशी तू आंगठे बहाद्दर तुला पत्र लिहायचं म्हटलं तरी वाचायला तू " अक्षरशत्रू" तुझ्याशी काही गोष्टी बोलता पण येत नाही.पण आज तुझ्याशी थोडेशे हितगुज करणार आहे.आई तुला मी जेव्हा पहातो.तेव्हा मला राणी कुंतीची आठवण येते.कारण तिने दुःख मागुन घेतले आणि आयुष्यभर दुःख तीला गोचिडा सारखं चिकटून गेले.तू दुःख मागितले नाही.पण दुःखाने तुला आपले सांगाती म्हणून निवडले.आणि आयुष्यभर दुःख तुला चिकटले.पण तरी तू डगमगली नाहीस.
        ऐन तारुण्यात कपाळीचे कुंकू पुसले. नटण्या मुरडण्याचे वय तुझे  पण आदिम स्त्री सारखी जगलीस. बाबा हे जग सोडून गेले; तेव्हा पदरात तीन चिल्लेपिल्ले मागे सोडून गेले.तू दुःखाला नाही कवटाळत बसलीस तर तू त्यावर मात केलीस,तू आमचा बाप झालीस.वादळात दिवा जीवंत कसा ठेवावे मी तुझ्या कडून शिकलो.काटकसरीने कसं जगावं तू शिकविले.
                    आई शेतात बैला सारखी राबलीस,सर्व पुरुषी कामे तू लाज पदराला बांधून शिकलीस.भाताच्या एक एकराच्या शेतात हाती विळा घेऊन तू हळूहळू करतकरत एकराचे शेत तू आडवी करायचीस.मग भाताचे भारे बाधून खळ्यात आणायचीस झोडून भात काढायचीस गडी माणसाने करावे ते तू केलस.सोबतीला आम्ही असायचो पण शेताच्या बांधावर बसण्या पुरते.आई ,पावसाळ्यात तू भाताचीलावणी  करायचीस आणि मी बांधावर ईरल्या खाली बसून तुला सोबत करायचो. आम्ही लहान होतो.पण तुझं घर कसं चालायाचे माहीत नाही.वेळ प्रसंगी लोकांपुढे हात पसरले पण वेळ निभावून नेलीस .
             बाबा आजरी होते चार वर्षे अंथरुणावर खिळले होते.पण पतीची सेवा कशी करतात मी तुझ्याकडून शिकलो.मला मदर तेरेसा तुझ्यात दिसायची.सर्व दागीने बाबांच्या आजारपणात विकलेस आणि लंकेची पार्वती झालीस.पण कधी साधं बोलली सुध्दा नाही.की कुरबूर नाही.तसा तुला नटायलाही आवडत नाही.पण आई दाद देतो तुझ्या हिमतीला बाबांचा तू भक्कम आधार झालीस.
               ऐकलं होतं तू सासूरवासपण भोगला.तुझी सासू म्हणे छळायची तुला.आई तू गुमान सहन केले.उलट म्हणाचीस नियतीने वाढून ठेवले आहे तुला.दिवसा शेतात राबून आल्यावर रात्री तुझी सासू दळण दळायला द्यायची,सर्व जेवल्यावर तू जेवायचीस मग भांडी घासून रात्री ऊशीरा झोपायचीस आणि सगळ्यात आधी तू उठायची.कसं गं जमलं तुला.एवढं करून म्हणे बाबांच्या हातून मारपण तुच खायचीस.पंधरा माणसांच्या कुटुंबात तू "थोरली जाऊ "पण कधी तुला तोराच मिरवता आला नाही.मग तुझा तू वेगळा संसार थाटला तुझ्या ख-या आयुष्याची सुरुवात झाली नि नवरा आजरी झाला.डोळ्यात तेल घालून रात्रभर जागलीस शेवटी नशीबाने दगा दिला.आणि आकली वैधव्य तुझ्या नशिबी आले.पण तू मान नाही झुकवलीस कुणा पुढे.
       आई तू एकदा आजरी पडली होती.आमचे धाबे दणाणले होते.तुझ्या ऑपरेशन साठी पैसे ही नव्हते.मला तर बाबा तुलापण वर बोलवतात असे वाटे.कारण बाबांना तुझी सवय लागली होती.पण देवाला आमची कीव आली नि आई तू आपोआप बरी झालीस.मी तुला तेव्हा हादरताना पाहिली होती;नाहीतर संकटावर तूच स्वार होतेस.
         आई काबाडकष्ट केले.पण लेकरांच्या हातात पाटी द्यायला नाही विसरलीस,लेकरांनी शिकावं हाच तुझा ध्यास.मला आठवतं आई, मला परीक्षेची फी भरायला पैसे नव्हते.तेव्हा तू तुझा उरला सुरला एक दागिना "मंगळसुत्र" तू हसत हसत काढून मोडलं होतं.आणि माझ्या शाळेची फी भरली होती.आई मी अभ्यास कराला बाहेर कुठेतरी झाडाखाली बसायचो तू तेथे जेवणाचे ताट नि तांब्याभर पाणी घेऊन यायचीस मी गपागप जेवताना यू कौतुकाने पाहायचीस तुझ्या पदराला मी हात पुसायचो नि मग तू निघून जायची.तुला वाटयचं लेकरू शिकू दे नि दैन्य मिटू दे,आई पहाटे चार वाजता ऊठून पाच वाजता गरमागरम भाकरीची न्याहारी करणारा जगातील मी भाग्यवान लेकरु असेन.आई,घरातून कधीच उपाशीपोटी तू बाहेर पडू दिले नही.बाबा गेले पण तू कधी जाणवूही दिले नाही.शाळेत घालायला एकच सदरा असायचा पण तो नेहमी स्वच्छ असायचा .काबाडकष्ट केले पण कधी फाटक्या कपड्यात शाळेत जायची वेळ आली नाही.
       आई आठवतो का गं तो दिवस मला नोकरी लागली.खरं तर तुला आनंद व्हायला पाहिजे.पण आई ;तू फार दुःखी झालीस.आरण मी प्रथमच तुला सोडून दूर जाणार होतो.तू त्या दिवशी रात्रभर रडत होतीस हमसून हमसून रडत होतीस.तुझे मुके हुदके तुझे ऊसासे मी रात्रभर ऐकत होतो.आयुष्यात पहिल्यांदाच तुझ्यापासून दूर जाणार होतो.तुझं ऐकून मीपण रडत होतो.
आणि आई सकाळी निघताना भावनांचा बाध फुटला आणि मायलेकरानी टाहो फोडला.आई ,
तुझ्या शिवाय जगताच येणार नाही असं सारखं वाटायचे.पण तुझ्या आशीर्वादाने सारे निभावले
        आई आता थकलीस गं ;तरी तुझी वणवण थांबत नाही.लेकरांना आता पंख फुटले आहेत.सुना नातवंडानी घर गजबजलेलं असतं.घराचं गोकुळ झालय.आई तुझ्या सुनांना तुझं त्याग बळीदान नाही माहित.तू सासूरवासपण भोगलं.पण तुझ्या सूनासाठी तू सासू कधी झालीच नाही.बोलल एखादी उलटसुलट कारण आता तुझी पानझड झाले. अन् बरं का आई एखाद्या दिवशी भुर्रकन उडून जाशील.बाबा सारखी.

         श्री.धनाजी जनार्दन बुटेरे
          पोई, कल्याण, जि. ठाणे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा