कवी श्री धनाजी जनार्दन बुटेरे आपले शब्दांचा गुलमोहर अनुदिनी वर आपले स्वागत करीत आहे सर्व कविता, लेख, कथा याचे स्वामीत्व हक्क राखून ठेवले आहेत.

शनिवार, १६ जानेवारी, २०२१

"शेतकरी हत्या की आत्महत्या?"

                            नुकताच एका वृत्तपत्रात शेतकरी आत्महत्येची बातमी वाचली. आणि मन सुन्न झाले. गेल्या वर्षभरात महाराष्ट्रात आकराशे शेतक-यांनी मृत्यूला कवटाळून घेतले.तर सन 2001 पासून तर आज पर्यंत म्हणजे गेल्या 19 वर्षात 16,918 शेतक-यांनी मृत्यूला जवळ केले आहे.हे फक्त विदर्भ व मराठवाडा या दोन प्रदेशात शेतकरी मृत्यूचे हे तांडव सुरू आहे. सरासरी दर आठ तासात एक शेतकरी मृत्यूला कवटाळून घेतो आहे. नक्कीच हे चित्र समृद्ध महाराष्ट्राला न शोभनीयच आहे. एकी कडे आमची याने परग्रहावर घिरट्या घालत आहेत. आणि दुसरी कडे मृत्यू शेतक-यांच्या घरावर घिरट्या घालत आहे. भारत विकसित होण्याच्या उंबरठ्यावर उभा आहे.आणि शेतक-याच्या दारावर मृत्यू दस्तक देतो आहे. एकीकडे आस्मानी सकंट त्याच्या समोर आ वासून उभे आहे.कधी दुष्काळ, तर कधी अवकाळी पाऊस. दोन्ही बाजूने तो संकटाच्या कचाट्यात सापडला आहे. दुष्काळात दुबार पेरणी, तर कधी हातातोंडासी आलेला घास आतीवृष्टी होऊन हिरावला जातो.विदर्भ व मराठवाडा हा जवळजवळ संपूर्ण शेतीवर आधारित प्रदेश. पिकराई आली की बळीराजाच्या घरात गोकूळ अवतरते.पण दुष्काळात मात्र सारे हरवून जाते.मग उरतो जगाच्या पोशिंद्या समोर पर्याय स्वस्त मरण्याचा.आपण म्हणतो शेतकरी मेला.
           राज्यात सरकारे येतात.नि जातात.सत्तेच्या मोहापायी या भाबड्या बळीराजाला कैक आश्वासने देतात.सत्ता आली की सारे मूग गिळून गप्प. एक मात्र खरे आजपावतो विरोधीपक्ष मात्र नेहमी शेतक-यांच्या पाठीशी राहिला आहे. पण सत्ता आली की तेच कालचे विरोधक शेतक-यांच्या तोंडाला पाने पुसतात. पण शेतकरी का मरतो ?हे आजून तरी कुणी या विषयाच्या मुळाशी जाऊन पाहिले नाही.ना शेतकरी आत्महत्येची गूढ शोधणारी एखादी कमेटी बसली,ना एखादा आयोग आला.फक्त शेतकरी कर्जबाजारीने मेला एवढेच माहीत आहे. शेतक-या आयुष्यात नेहमीच दुष्काळ असतो असं नाही.कधी तरी आबादानी येते.पण एकाच वेळी एकाच प्रदेशातून एकाच प्रकारच्या मालाची इतकी आवक येते ; की शेतमाल कवडीमोल भावाने द्यावा लागतो.नाही तर फेकून तरी द्यावा लागतो.आधीच कर्जबाजारी त्यात मालाला भाव नाही. आणि मग एक दृष्टचक्र त्याच्या वाट्याला येते.आज बाजारात टाॅमेटोचा भाव पाच ते दहा रुपये किलो आहे. मेथी जी महिन्याभरापूर्वी पन्नास रुपये दराने विकली जात होती.ती दहा रुपये दराने विकली जाते.मटार दीडशेच्या दराने विकली जात होती. आज ती वीस ते तीस रुपये दराने विकली जात आहे. बरं हा शेतमाल आपण दलाला मार्फत घेतो.मग विचार करा ? शेतक-याला या पाच रुपयातून किती रुपये मिळाले असतील.कसं त्याने कर्ज फेडावे ? कसं घर साभाळावे की सावरकराचे देणे द्यावे. बर सावरकरांचे नाही दिले की चक्रवाढ दराने पैसे फेडणे आले.पुढच्या वर्षी नक्की पिक येइल की नाही? ते ही सांगता येत नाही.? 
भास्कर चंदनशीव यांची एक कथा आहे "तांबडा चिखल " टाॅमेटोची इतकी आवक वाढते की कुणी फुकटपण घेत नाही मग नायक संतापतो. नि टाॅमेटोचा चिखल करतो.तोच हा तांबडा चिखल हा चिखल शेतक-याच्या वाट्याला येतो.जास्त आवक आली म्हणून माल निर्यात करता येतो.पण तशी सुविधा आपणाकडे खेड्यापाड्यात नाही. दुसरी गोष्ट भारतीय शेतमाल युरोपीयन राष्ट्र थेट स्वीकारत नाही. पुन्हा येथे चाचण्या आल्या. कीटकनाशकांचा प्रमाणापेक्षा जास्त वापर झाल्यास युरोप मधे या मालाला बंदी आहे.म्हणजे एक तर शेतक-यांना या विषयी प्रशिक्षण द्यावे लागेल.त्या ही पेक्षासोपा मार्ग म्हणजे शेतमालावर प्रक्रिया करणारे उद्योगधंदे शेतक-यांच्या जवळपास निर्माण झाले पाहिजेत.टाॅमेटो साॅस दिडशे किलो.पण टाॅमेटो दहा रुपये.अशी कोणती जादू होते.भांडवलदार शंभरपट नफा कमावतो.आणि शेतकरी जो वर्षभर काबाडकष्ट करतो.त्याला मूळ खर्च सुध्दा मिळत नाही.थोडक्यात शेतमाल शेजारी शेतमालावर प्रक्रिया करणारे उद्योगधंदे निर्माण झाल्यावर शेतक-याला कोणताच शेतीमाल कवडीमोल किमतीने विकावयास लागणार नाही.किमान राज्य सरकारने शितगृहे उभी करावी. किमान शेतमाल मुंबई दिल्ली चेन्नई यासारख्या महानगरांमधे पाठविण्यासाठी स्वस्तास रेल्वे सेवा. किंवा विमान सेवा.तसं ही कुठे दिसत नाही.मग आवक वाढली की शेतमाल फेकण्यात शिवाय शेतक-याकडे दुसरा पर्याय पण नसतो.
                                   कृषी उत्पन्न बाजार समिती प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी आहे.पण येथे शेतमाल दलाल घेतात.जर शेतक-यांना शेतमाल विक्रीसाठी गाळे उपलब्ध करून दिले तर थोडा फार पैसा त्याच्या हातात येईल .पण येथे ही सरकारची उदासिनता दिसते.त्यामुळे दलाला मोठे झाले. मागील महिन्यात कांद्याची दोनशेचा आकडा गाठला.पण यात शेतक-यांचे कांदे किती होते.  शून्य !:जर हा भाव शेतक-याला मिळाला असता तर नक्कीच तो सुखावला असता; पण येथे दलाला माजले.जर सरकारने शेतक-यांना कांदाचाळीसाठी बीनव्याजी कर्ज किंवा काही अनुदान दिले तर कांदा कवडीमोल दराने विकण्यापेक्षा तो कांदा चाळीत जाईल.नि बळीराजा सुखावेल. 
                         लग्न परंपरा ही एक शेतकरी आत्महत्येचे कारण आहे. त्यात मुलीच्या लग्नात हुंडा द्यावा लागतो.कायद्याने हा गुन्हा आहे.पण हाच गुन्हा महाराष्ट्रातील कितेक आईवडील बीनदिक्कत करतात.तसा गुन्हा आपण केला आहे हे ना नवरा वा नवरी मुलीच्या नातेवाईकांना वाटत असते. लग्न समारंभात केला जाणार प्रचंड खर्च गरीब शेतक-याच्या जीवावर उठतो.मुलीचे लग्न आहे.म्हणून जास्त शेती कसळायला घेतली जाते.बी बियाणे, खत,मशागत,यंत्र सामग्री, या वर खर्च केला जातो.निसर्गाने जर धोका दिला की सर्व आकांक्षावर पाणी फेरले जाते. आणि गरीब मुलीचा बाप स्वतः जगण्याच्या लायक समगत नाही. जर आली तर सरकारी मदत येईल कदाचित त्या पैशातून लेकीचे लग्न होईल या आशेवर गरीब शेतकरी स्वतःच स्वतः पणाला लावतो.आणि या जगाचा निरोप घेतो.
           काही ही असो पैसा हा शेतकरी आत्महत्येचे मूळ कारण आहे.कर्जमाफी यावर उपाय होऊ शकत नाही. त्यापेक्षा सरकारने शेतकरी बॅक काढून. शेतक-यांना दीर्घ मुदतीची काही लाख रुपयांची कर्जमाफी दिले.तर बराच फरक पडेल.बरेच शेतकरी बांधव.मरणापासून वाचतील.कारण सरकार कोटी कोटी प्रकल्पासाठी  खर्च करतो.तर हा शेतकरी वाचवण्याचाही प्रकल्प हाती घ्यावा ही मायबाप सरकारला विनंती. नाही तर शेतकरी आत्महत्या नसून त्या हत्याच ठरतील.

प्रा.श्री धनाजी जनार्दन बुटेरे 
मु.पोई,पो.वाहोली ता.कल्याण जि ठाणे 
            

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा