निसर्गाची सर्वात सुंदर रचना म्हणजे माणूस. मानव म्हणजे त्याला भावभावना आल्याच.कोणी सुखी तर कोणी दुःखी. सुखाने माणूस हुरळून जातो तर दुःखाने खचून जातो.ही प्रक्रिया अव्यहतपणे निरंतर चालू आहे. कुणाच्या वाट्याला फक्त दुःखच आहे तर कोणी जन्मतःच तोंडात सोन्याचा चमचा घेऊन येतो.हा प्रत्येकाच्या नशिबाचा भाग असतो.पृथ्वीवर जसे खाच खळगे आहेत, तसे मानवी जीवन सुख दुःखाने भरलेले आहे. यात राणी कुंती सारखी व्यक्ती ती दुःख पचवते.पण कमजोर दिलाचे तेथेच आपली जीवनयात्रा संपवितात.मानव जन्म पुन्हा आहे की नाही माहित नाही संत ही म्हणतात नर देह तेतीस कोटी योनीतून जन्म घेतल्यावर मिळतो.म्हणून संत मानवीदेह हा दुर्लभ आहे असे म्हणतात. म्हणून या जन्मात नर देहाचा आनंद घ्या.
व्यक्तीपरत्वे सुख दुःखाच्या व्याख्या बदलतात कुणी नापास झाला म्हणून जीवन संपवितो, कुणी कमी गुण मिळाले म्हणून आत्महत्या करतो. कोणी मेरीट थोडक्यात हुकली म्हणून आत्महत्या करतो. तर कुणी मेरीट मधिल पहिला नंबर चुकला म्हणून आत्महत्या करतो. येथे अती महत्वाकांक्षा हे दुःखाचे मूळ आहे हे लक्षात घ्या. विश्वात कोणत्याही गोष्टी परीपूर्ण नाही मग मी परीपूर्ण कसा असेन ? हा प्रश्न स्वतः ला नेहमी विचारा.चंद्राला पूर्णत्व येण्यासाठी अपूर्णातून जावे लागते निरनिराळे आकार धारण करावे लागतात तेव्हा कुठे पूर्ण चंद्र तयार होतो.मला प्रत्येक गोष्ट लगेच कशी मिळेल? मला जर खरोखरच सुखी व्हायचे असेल तर मी माझ्या पेक्षा गरीब माणसाकडे पाहिले पाहिजे. मुक्याने पागळ्याकडे पाहून सुखी व्हायचे. पागळ्याने आंधळ्याकडे पाहून सुखी व्हायचे. आणि आंधळ्याने पक्षाघाताने वाचा गेलेल्या, अंथरुणात निपचित पडलेल्या मानसाकडे पाहून सुखी व्हायचे.
शेजारी फ्रिज आहे एसी.आहे. आपल्या कडे नाही तर आयुष्यात कायम दुःखी रहाल.आहे त्यात सुख माना सुख पायावर लोळण घेईल. मात्र स्वप्नांच्या मागे धाऊन अपयश आले तर दुःख न मानता जे प्राप्त होईल त्यात आनंद शोधा जीवन सुंदर होईल.
आयुष्य जगताना खेळकर वृत्तीने सामोरं जा.रस्त्यावर जाताना पाय घसरून पडलात.लोक खो खो हसणार तुम्ही ही हसा.पडल्याचे दुःख वाटणार नाही. पण आता आपण पडलो. म्हणून लोक हसतील हा विचार घेऊन ऊठलात तर नक्कीच दुःख व्होईल.
बरीच माणसं पडल्याने दुःखी होत नसतात .तर पडल्यावर लोकांनी पाहिले या गोष्टींवर दुःखी होतात.
लहान मूल पडले म्हणून रडत नाही सगळे आपण पडल्यावर हसले याचे वाईट त्याला वाटते म्हणून ते रडते.विदूषक हा सर्कसमध्ये लोकांची हसवणूक व्हावी म्हणून निर्माण केलेले पात्र पण त्याच व्यंगाचा उपयोग तो आपल्या चरितार्थासाठी उपयोग करून आनंदी होतो.
माझ्या परीचयाचे जोशी दांपत्य आहे सुखीकुटुंब म्हणून लोक त्यांच्याकडे बोट दाखवतात . पण सौ.जोशी यांच्या आनंदाची कल्पना मध्येच बदलली आणि जोशी दांपत्य दुःखी झाले. सौ.जोशी यांना सोन्याच्या दागिन्यांनचा मोह झाला. जोशी काकांनी कर्ज काढून बायकोची हौस भागविली.आणि काकांची कर्जाचे हफ्ते नि कुटुंबाचीा जबाबदारी सांभाळत सांभाळत नाकी नऊ आले. मिळणारी मिळकत तुटपुंजी त्यात घर ,कर्जाचे हफ्ते, सण ऊत्साव, पाहुणेराऊळे यात काका वैतागून गेले. काकांचा पेपर बंद झाला, दाढी हाताने झाडू लागले. इस्त्रीला परीट लागायचा आता हाताने इस्त्री होते.
रिक्षा बंद झाली. पायपीट वाढली.केबल वाला बंद झाला. सुटीचे फिरणे बंद झाले.काकुंना फरक नसेल पडला पण काकांना नक्कीच पडला. आता दागिन्यांनी हौस ती मेली केवढी पण काकांच्या आनंदात विरजण पडले.मग आता मला सांगा सुख ते काय?
अभिलाषा ही केंव्हा केंव्हा माणसाला दुःखाकडे ओढते.मला ऐश्वर्या सारखी सुंदर बायको हवी.सुंदर समजू शकतो पण ती " एश्वर्या "सारखीच
का असली पाहिजे? माझ्या कडे कार हवी.पण ती मर्सीडीजच का?झोपडीत राहणारा टुमदार कौलारू घराचे स्वप्न पहातो. त्यात वावगे काहीच नाही. पण बंगला असणारा हवेलीचे स्वप्न पहातो. हवेलीत रहाणार राजवाड्यांचे स्वप्न पहातो. येथे अभिलाषा ही दुःखाचे मूळ आहे. नगरसेवकाला वाटते आमदार व्हावे. आमदार म्हणतो नामदार व्हावे. मंत्री म्हणतो मी मुख्यमंत्री व्हावे. मुख्यमंत्र्यांला वाटते सर्व महत्त्वाची खाती आपल्याकडे असावी. किंवा आपण केंद्रीय मंत्रीमंडळात असावे.किंवा आपण पंतप्रधान असावे.पंतप्रधानाला वाटते ही खुर्ची मरेपर्यंत कुणालाच भेटू नये म्हणजे कोणीच समाधानी नाही. सर्व मिळून सुध्दा माणूस आत्मसंतुष्ट नअसल्यामुळे तो दुःखी आहे. परंतु मूळ कारण अभिलाषा हेच होय.
संसारात सर्वत्र दुःखाचे मळभ दाटलेले आहेत. आपण त्यामधे आपला आनंद शोधला पाहीजे."पेला अर्धा भरलेला आहेत "म्हणून सुखी व्हायचे .' की " पेला अर्धा रिता आहे. "म्हणून सुखवस्तू व्हायचे हे आपण ठरवायचं. मुलगी झाल्यावर बाप झालो याचा आनंद मानायचा की वंशाच्या दिव्यांचे काय?म्हणून दुःख मानत बसायचं हे आपल्या हातात आहे.
सुख प्रत्येक गोष्टीत आहे. मदरतेरेसाना ते दीनदुबळ्यांच्या सेवेत सापडले.बाबा आमटेना महारोग्यांच्या सेवेत मिळाले. गाडगे महाराजांना समाजसेवेत सापडले. लता मंगेशकरांना गाण्यात सापडले. सिधुताई सकपाळ यांना निराधार मुलांनमधे गवसले.दुस-याला सुखी करून स्वतःही सुखी झाले.
आपल्या सुखाच्या कल्पना वेगवेगळ्या असतात. त्या आपणास सुखवादी बनवतात.कधी निराशा पदरी पडते.मग कपाळमोक्ष ठरलेला म्हणून समजा.चिमूटभर सुखासाठी माणूस आभाळभर सुखाची होळी करतो.आकाशातील चांदण्या हातात येत नसतात. त्या पाहून सुख मिळवा.राजा महालातून असतो पण तरी तो सुखी नसतो.खरं सुख गवताच्या झोपडीत असते. पैशात सुख मानणारा वर्ग फार मोठा आहे. पण पैसा दुःखाचे मूळ कारण आहे. पैशात सुख असते तर जगातील दहा श्रीमंत सर्वांत सुखी असते.पण तेमुळीच सुखी नाही. सुख हे क्षणभंगूर आहे. ते नश्वर आहे. दुःख माणसांचे सोबती आहे.
कारण ते मानसाची पाठ सोडत नाही.
प्रा. धनाजी जनार्दन बुटेरे
- पोई कल्याण ठाणे
शुक्रवार, २१ एप्रिल, २०१७
हे जीवन सुंदर आहे. (लेख)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा