कवी श्री धनाजी जनार्दन बुटेरे आपले शब्दांचा गुलमोहर अनुदिनी वर आपले स्वागत करीत आहे सर्व कविता, लेख, कथा याचे स्वामीत्व हक्क राखून ठेवले आहेत.

शनिवार, ५ नोव्हेंबर, २०१६

आगोट (1)

                              कावळ्यांची घरटे करण्याची सुरुवात झाली की शेतकरी पावसाळ्याची नियोजन बद्ध ची तयारी करतो तो करण्याचा काळ म्हणजे "आगोट".हा आगोट चा काळ म्हणजे शेतक-याच्या जीवनात महत्वाचा काळ.या वेळी महिला आपल्या स्वयंपाक घरातील जिन्नसांच्या तयारीला लागतात. तर गडी माणसं शेती, लाकूडफाटा, या गोष्टी पहात.सा-यांची कामात लगबग असायची आम्हा लहान मुलांना हा काळ आनंदाचा असायचा. पंधरावीस वर्षांपूर्वी गावात वीज नसायची. त्यामुळे पंखा कुलर एसी हा काय प्रकार माहितच नव्हता .मग घरा समोरच्या अंगणात सर्व हरीने झोपायचो . माझा सर्वात आवडता क्षण तो हाच.रात्री ऊशीरा पर्यंत गप्पा रंगायच्या. गप्पा चालू असताना मी आकाशाकडे पहात. चांदण्यांचे निरीक्षण करियचो सर्वांत मोठी कोणती.? कधी एखादा तारा तुटायचा नि घाईघाईने तो पृथ्वीवर झेपायचा मलाहे फार विलक्षण वाटे.कधी तरी राखाडी रंगाचा पट्टा आकाशात पाहिल्याचे आठवते. आत्ता कळलं त्याला धुमकेतू म्हणतात. गुरुजी कधी कधी एखाद्या विद्यार्थ्यांना सुध्दा " काय धुमकेतू सारखा उगवतो.हे आता लक्षात येते.एखादीचांदणी आकाशात फिरतांना मी पाहिल्याचं आठवतंय. मेलेली माणसं वर जातात म्हणजे कुठे जातात? हे शोधण्याचा माझे चिमूकले डोळे प्रयत्न करायचे.मी बाबांना विचारायचो "बाबा मेले ली माणसं कुठे जातात? बाबा म्हणायचे ती चांदणी होतात. मग मी माझ्या आत्याला चांदण्यांमधे शोधण्याचा प्रयत्न करायचो.माझी आत्या नुकतीच देवाघरी गेली होती. प्रत्येक चांदणीमधे मला आत्या दिसायची. शांत चित्ताने आकाश मी किती तरी वेळ निरखून बघायचो.सारे आकाश डोळ्यात भरून कधी झोप लागायची ते कळत नसायचे. सकाळी जागा यायची ती चिमण्यांच्या चिवचिवाटाने आमच्या अंगणात एक मोठ्ठ रामफळाचे झाड होते. त्यावर सकाळ संध्याकाळी चिमण्यांचा चिवचिवाट असायचा. आता ना चिमण्या ना ते झाड राहिले. आगोटीला बायमाणसं अंगणात कुरडया पापड,मिरगुंडी, कोंडवडी,भातवडी,डाळीचे वडे,खारवडी,काही "खारोडी"पण म्हणतात. तर खारोडी म्हणजे तांदुळाच्या पिठाचा पदार्थ. याची पेज करून लहान आकाराचे पुंजके कापडावर टाकून सुकवून घ्यायचा एक पदार्थ. हा ओला असताना लहान मुले घसरून यावर पडायची.हा देखावा फार गमतीशीर असायचा. यावेळी आम्ही मुले राखनदाराची भूमिका पार पाडायचो.त्यावेळी अंगणात बसून आम्ही लहान भावंडे एकत्र जेवण करत असू.इतर वेळी आम्हाला बाहेर बसून जेवण करायची मुभा नसायची. माझ्या आगोट यासाठी लक्षात आहे. ती म्हणजे चारमहिन्याचा लाकूडफाटा गोळा करण्यासाठी शेतकरी आपली बैलगाडी घेऊन दोनतीन गड्या सोबत जंगलात जातात. मी ही बैलगाडी सोबत जंगलात जायचो.लहान मुलांना येथे काही काम नसते. पण आम्ही मुलं जंगलात हुंदडण्याचा आनंद मनसोक्त घ्यायचो.तो काळ "करवंद" "जांभळं " "आंबे" "धामण " "भोकरं" या रानमेव्याचा काळ. भोकरं म्हणजे एक चिकट गर असणारे चिकट फळ याची बी चोखायची असते.याच फळाने मराठी भाषेला एक वाक्प्रचार बहाल केला आहे तो कंजूस माणसाला वापरतात. "चिकटभोक-या" हा तो हात शब्द.गडी माणसं फाटी तोडून गाडी भरे पर्यंत आम्ही धूळभरल्या करवंदाचा अस्वाद घ्यायचो.धूळ भरली करवंद खाण्याचा आनंद फार वेगळा. गाडी शिगोशिग भरायची. एव्हाना बैल बरोबर नेलेला पेंढा खात असत.गाडी भरून झाली की बैलांना पाणी पाजायला नदीवर नेले जायचे.नदी आटलेली असायची कुठे तरी एखाद्या डोहात पाणी असायचे.बैलांना पाणी दाखवून झाले की डोहात मनसोक्त डुंबायचे. बरोबरचं पाणी संपलेले असायचे तहान लागायची.मग कुठे तरी वाळूत लहान खड्डा खोदायचा त्यामध्ये काही वेळाने थंड नितळ पाणी गोळा व्हायचे ते ओंजळीने पिण्याची मजा औरच. मग गाडीला बैल जोडून गाडी घराकडे निघायची. आम्ही मुलं शिगोशिग भरलेल्या गाडीवरचा बसायचो. अशा गाडीत बसण्यातला आनंद वेगळाच. शेतक-यांच्या कामाची लगबग असायची. बांधबंदिस्ती,सरपन घरात रचून ठेवणे, त्यासाठी विशिष्ट प्रकारची पडवी शेजारी मचाण रचली जायची.त्यावर लाकूडफाटा रचला जायचा.ही रचलेली फाटी पावसाळ्यात शेतकरी सरपन म्हणून वापरत.दुसरे महत्वाचे काम म्हणजे रानभाज्या सुकवणे.रानभाज्या या मौसमात मोठ्या प्रमाणात उगवतात .प्रत्येक घरासमोरच्या अंगणात रानभाज्या सुकवण्यासाठी ठेवण्याचे दृश्य नजरेस हमखास पडते. गुरांसाठी पेंढ्याची वैरण भरण्याची लगबग. चाललेली असायची. तेंव्हा ब-याच घरांची छप्पर ही भाताच्या पेंढ्याची असायची. घराघरावर चढलेली माणसं. चित्र पाहयला मिळायचे.आणि शेजारच्या लोकांशी भांडण होण्याचा हा मोठा मौसम कारण पडसाला कुंपण करताना सिमेचा प्रश्न निर्माण व्हायचा.आणि रुपांतर भांडणात व्हायचे.याला लोक "कज्जा"म्हणत हे कज्जे गावागावत होत असत. पावसाळा सुरुवात झाली की घराघरात नांगर काढले जात.सुताराकडे ठोकून ठाकून घेतले जात.लोहारा कडून फाळ पाजळून घेतले जात. नविन गो-हांना वेसन घातल्या जात.वेसण घातलेले गो-हे नांगरासाठी शिकवले जायचे. नवीन गो-हे शिकवणे फार जीकरिचे काम.
        ( भाग दोन पुढील लेखात )

आगोट (2)

                                   हे गो-हे कधी कधी संप पुकारत. एका जागे वर मांड ठोकून बसले म्हणजे त्याला परत ऊठून चालते करणे म्हणजे दिव्यच.मग त्याला उठवण्यासाठी नाना उपाय केले जात.त्यामध्ये त्याच्या शेपटीला चावणे, शेपटी पिरगाळणे.डोळ्यात लाल मिरची पुडी टाकणे,नाक दाबणे, पराणीने टोचणे.पराणी म्हणजे लाकडाच्या काठीला लोखंडी टोकदार खिळा ठोकून ते बैलांना टोचणे. अशा अघोरी उपायाने गो-हा चौखूर उधळायचा वाट मिळेल तिकडे पळत सुटायचा.आम्हा मुलांना करमणूक व्हायची. गो-हातचा जीव जातो हे कळण्याचे वय नव्हते. कधी कधी गो-हा बेभान होऊन .गाडी उलटून अपघात व्हायचे. केव्हा केव्हा जुना म्हातारा बैल शेजारी बैलांना होणारी मारहाण छळ बघून म्हातारा बैल उधळायचा कदाचित तेव्हा पासूनच "ढवल्या शेजारी पौळ्या बांधला गूण नाही पण वाण लागला "ही म्हण वृढ झाली असावी. पाऊस थोडा रामला की पेरणी ला सुरवात व्हायची. नांगर स्वच्छ पाण्यात धुतला जाई हळदीकुंकू लाऊन नांगराची पूजा केली जाई.दोन बैलांच्या खांद्यावर जुकार (जू) ठेवला जाई त्यावर नांगर उलट बाजूने टाकून त्याला दोरखंडाने आशा रितीने बांधला जाई की नांगर सरळताठ बैलांच्या जुकारावर ऊभाच राही हे दृश्य फार मनोहारी असे.आता तसे क्कचित दृष्टीस पडते. शेतावर माळावर राबवून पेरलेले की वरून नांगर फिरवला जाई.या वेळी रानपाखरांचे मंजूळ गुंजन ऐकायला मिळायचे विविध जातीची वेगवेगळ्या प्रकारची पाखरं याची देही याची डोळा पहाता येत. विविध जातीचे कीटक फुलपाखरे कदाचित या चिमुकल्यांची नोंद कुठेच नसेल पाखरांचा किलबिलाट " पेरते व्हायला पेरते व्हा " पाखरांच्या. हाका ऐकून कान तृप्त व्हायचे कोकीळेचा सप्तकातील मेघमल्हार येथेच मनसोक्त ऐकता येतो. तुम्हाला शिव्यांचा अभ्यास करायचा असल्यास आगोटीला पेरणीच्या वेळी कोकणात या नाना रंगाच्या नाना ढंगाच्या विविधतापूर्ण शिल अश्लील शिव्यांचा येथे "नांग-या "म्हणजे नांगराचा चालक नांगराच्या बैलांना देत असतो. बाळ मनावर कळतनकळत याचे परीनाम होतातच. आता हे जुने वैभव लोप होत आहेत. आता ना गुरे ,ना बैल ,ना नांगर,ना त्या पाखरांचे मनोहारी गुंजन. ना त्या पेरणीच्या गोड मनाला रुंजी घालणा-या आठवणी.

✒ प्रा.धनाजी जनार्दन बुटेरे
मु.:- पोई ;पो :- वाहोली ता :- कल्याण ;
जि.:- ठाणे 📞9930003930
             Copyright

शुक्रवार, ४ नोव्हेंबर, २०१६

कविता

@ 👌अजब सरकारची गजब गोष्ट😅@
श्री.धनाजी बुटेरे यांची कविता

तुमच्या हाती सत्ता
:तुमच्या हाती पत्ता.
तुमच्या साठी सा-या तरवारी म्यान होतात. तुमच्यासाठी सरकारचे निर्णय किती छान होतात.॥

सारे फुकट ,तरी गळेलठ्ठ पगार वाढते.
सरकार जादु सारखे क्षणात GR काढते.
विरोधकांची विद्ववत्ता कुठे गहाण होतात .॥

तुमच्यासाठी सरकारचे निर्णय किती छान होतात.॥ पाच वर्षे ऐश करता लोकांसांगता सेवा.
आयुष्यभराच्या पेन्शनचा तयार केला मेवा. स्वार्थासाठी सारे योध्दे आता कसे नादान होतात ॥ तुमच्यासाठी सरकारचे निर्णय किती छान होतात.॥

सैनिक मरतो सीमेवर त्याला नाही पेन्शन. जग घडविणारा शिक्षक त्याला उद्याचे टेन्शन.
एवढी मजा मारून राव अजूनही बेभान होतात ॥ तुमच्यासाठी सरकारचे निर्णय किती छान होतात.॥

कामगारांच्या घामाची केली कुणी कीव.?
चारदोन रुपड्यासाठी शेतकरी देतो जीव.
वाराखात गाराखात पोलीस बेजान होतात ॥ तुमच्यासाठी सरकारचे निर्णय किती छान होतात.॥

श्री धनाजी जनार्दन बुटेरे
कल्याण ठाणे
🌺🌺🌺🌺🌺🌺🌼🌼🌼🌼🌼🍀🍀🍀🍀

अजब सरकारची गजबजली गोष्ट

@ 👌अजब सरकारची गजब गोष्ट😅@

श्री.धनाजी बुटेरे यांची कविता

तुमच्या हाती सत्ता :तुमच्या हाती पत्ता.
तुमच्या साठी सा-या तरवारी म्यान होतात.
तुमच्यासाठी सरकारचे निर्णय किती छान होतात.॥

सारे फुकट ,तरी गळेलठ्ठ पगार वाढते.
सरकार जादु सारखे क्षणात GR काढते.
विरोधकांची विद्ववत्ता कुठे गहाण होतात .॥ तुमच्यासाठी सरकारचे निर्णय किती छान होतात.॥

पाच वर्षे ऐश करता लोकांसांगता सेवा.
आयुष्यभराच्या पेन्शनचा तयार केला मेवा.
स्वार्थासाठी सारे योध्दे आता कसे नादान होतात ॥ तुमच्यासाठी सरकारचे निर्णय किती छान होतात.॥

सैनिक मरतो सीमेवर त्याला नाही पेन्शन.
जग घडविणारा शिक्षक त्याला उद्याचे टेन्शन.
एवढी मजा मारून राव अजूनही बेभान होतात ॥ तुमच्यासाठी सरकारचे निर्णय किती छान होतात.॥

कामगारांच्या घामाची केली कुणी कीव.?
चारदोन रुपड्यासाठी शेतकरी देतो जीव.
वाराखात गाराखात पोलीस बेजान होतात ॥ तुमच्यासाठी सरकारचे निर्णय किती छान होतात.॥


श्री धनाजी जनार्दन बुटेरे
कल्याण ठाणे

🌺🌺🌺🌺🌺🌺🌼🌼🌼🌼🌼🍀🍀🍀🍀

posted from Bloggeroid

आठवणींच्या श्रावणसरी (2)

माझ्या श्रावण लक्षात आहे तो लहान पाणी केलेली मौजमजा दंगामस्ती साठी. श्रावणाची चाहूल लागायची ती गावातील फक्त आमच्या घरी रात्री जेवनखाणं ऊरकली की पोथी वाचण्याचा कार्यक्रम होत असे मग पोथी ऐकणारामधे जास्त सहभाग म्हातार्या माणसांचा असे. मला महाभारतातील कथांचा परीचय या वयात झाला.माझ्यासाठी ही पर्वणीच असे.कारण गोष्टी ऐकायला मिळायच्या. नागपंचमी झाली की; ओढ लागायची "दहीहंडीची" कारण आमच्या गावात दहीहंडी उत्सव वेगळ्या प्रकारे साजरा होतो. सप्तमीला कृष्ण जन्माचे जागरभजन भजन रात्री बारा पर्यंत चाले.मग कृष्णजन्माचा सुंटवडा हातात पडे की मग उपवास सुटत असे. वर्षातून फक्त याच दिवशी बारा नंतर जेवण केले जाई.दुसरा दिवस उजाडला की मंदिरात गावकरी जमत मग भजन होई.आणि मग कृष्णजन्माची मिरवणूक गावात टाळमृदूंगाच्या साथीने निघत असे.पालखी नसायची की पताका फक्त भिजणारे आणि भिजवणारे ऐवढेच मिरवणूकीत असे.आम्ही चिल्लेपिल्ले उड्या मारत पावसात भिजत घोरोघरी पाणी पाणी ओरडत बोंबलत असू.मग आबाळवृध्द, वृध्द घरात घुसून सर्व पाणी मुलांच्या अंगावर फेकत .कुठे कुठे पोह्यांचा प्रसाद वाटला जाई.आम्ही शेण चिखल एकमेकांच्या अंगावर फेकत गोंगाटकरत उत्सव साजरा करत असू.भजनकरी हळूहळू पुढे सरकत. एखाद्या घरासमोर दहपंधरा फुटांवर दहिहंडी बांधलेली असायची. मग त्या ठिकाणी फक्त आमच्या गावात जे पारंपरिक टिपरीनृत्य आहे ते रिंगण करून लहान मोठे म्हातारे सहभागी होत नाचत असत.या नृत्याचे एक वैशिष्ट्य आहे जो पखवाज वाजवण्यासाठी वाकबगर आहे. तोच हे वाजवत असे कारण वाजवणारा व नाचकरी यांच्यात जुगलबंदी चालायची. धिणां धिणा धिण्णा धिंण धिणां धिणा धिण्णा धिंण असे बोल पखवाज वाला काढी. पुढे वेग वाढत जायचा नाचणा-यांचे पायांना गती यायची.आम्ही ती जुगलबंदी पाहून दंग होत असू.चार पाच नाचण्याचे प्रकार होत.ही वृत्ते गवळणी या प्रकारावर केले जाई. मग संत तुकाराम यांचा अभंग चालू होई. लहान थोर पाहू नका तुका म्हणे हुंडी ठोका. असे म्हणताच आमची चलबिचल सुरू व्हायची ती तिस-या थरावर चढून हंडी फोडण्यासाठी. हे थर लहान मुलांना घेऊन लावले जातात. दोन तीन वेळा थर कोसळत मग कुणाचे तरी डोके फुटे.मी वर जावा म्हणून धडपडत असायचो.कधी तरी प्रयत्न यशस्वी व्हायचा. मी वर जाऊन हुंडी फोडली हे वर्षभर. मुलांना सांगायचो.हा क्षण मला वर्षभर पुरायचा.हंडीफुटली की खालच्या थरावरील मूलं हातसोडून देत मग आम्ही वरच्या थरावरील मूलं धडाधड खाली कोसळत असायचो.लागायचं खरचटले जायचे. पण पडण्यापेक्षा हंडी फोडण्याचा आनंद काही औरच.दहीहंडी फुटायची आणि मग खेळ रंगायचा तो भिजण्याचा ज्या घरातील हंडी असे त्या घरातील सर्वच पाणी बाहेरील गोविंदावर फेकले जायचे.गोविंदा,गोविंदा,असा जयघोष व्हायचा. त्या वेळी घरं ही कुडांची व खाली जमिनी असायची. घरात जमीन भिजून जायची कोरडी जागा जरा सुद्धा नसायची पण घरात "गोकूळ" नाचले म्हणून घरमालकीण धन्य व्हायची. मिरवणुक पुढे सरकत जाई.गावात शेणमिश्रित पाण्याचे पाट वहायचे. गाव नि माणसं चिंब होत. गोकुळ नाचून मंडळी परत मंदिरात यायची. तेथून मोर्चा धळायचा तो विहीरीवर फक्त आजच्याच दिवशी या विहीरीत उड्या मारण्याची मुभा असायची.मनसोक्त उड्या मारून झाल्या कीं पाय घराकडे वळायचे. गोड आठवणी डोळ्यात साठवत. गोविंदा रे गोपाळाा .म्हणत उड्या मारत आमची स्वारी घराकडे परतायची. श्री धनाजी जनार्दन बुटेरे मु.पोई ; तालुका :- कल्याण ; जि.ठाणे . 421103 djbutere@rediffmail.com

आठवणींच्या श्रावणसरी (1)

मला श्रावणाचे फार अप्रुप वाटते.सृष्टीचा प्रियकर म्हणजे श्रावण,सृष्टी आताच तारुण्यात आली असा क्षणाक्षणाला भास करून देणारा ,आणि मिलना साठी धरती अतुर असते तो हा श्रावण. हिरवीगार धरा नटून ज्याच्यासाठी तिष्ठत ऊभी असते तो हा श्रावण. अंगाखांद्यावर ईवले ईवले झरे घेऊन त्यांच्याशी खट्याळपणे मस्ती करणारा खट्याळ श्रावण. फुलपंखावर रंग भरून फुलपंखावर बागडणारा श्रावण. रानपाखरांच्या गुंजना मधे धुंद श्रावण. आकाशात सप्तरंगाची कमान ऊभारणारा श्रावण. ऊनपावसाचा खेळ मांडणारा श्रावण. रानफुलांच्या बहराने रानोमाळ फुलांनी फुलकीत करणारा श्रावण. हजारो इवली इवलेसे रानफुले धरतीच्या कुशीतून हळूच डोके वर काढून सृष्टीचा चैतन्य प्राप्त करून देणारा श्रावण. कवीच्या शब्दांना कागदावर सांडणारा श्रावण. कवीजनांचे आणि श्रावणाचे फार सौख्य. श्रावण झरला की कवी ही शब्दात झरल्या शिवाय रहात नाही. बालकवी ची " श्रावणमासी हर्षमानसी, हिरवल दाटे चोहिकडे क्षणात येते सरसर शिरवे क्षणात फिरूनि ऊनपडे ॥ वरती बघता इंद्रधनु चा गोफ काय तो विणलासे मंगल तोरण काय बांधले नभी मंडपी कुणी भासे ॥ ही कविता अबालवृद्धांन पासून आजच्या पीढीला तोंड पाठ नसली तर नवलच. तर बा.सी मर्ढेकर श्रावण वेगळ्या पध्दतीने चितारतात.ते म्हणतात. आला आषाढ श्रावण आल्या पावसाच्या सरी किती चातक छोटीने प्यावा वर्षाऋतु तरी! मर्ढेकर श्रावणाची चातकाने प्रमाणे वाट पहातात. श्रावणात घननिळा बरसला रिमझिम रेशमधारा. उलगडाला झाडातून अवचित मोर पिसारा हे गीत श्रावणात रेडिओवर नाही वाजले तर श्रावण येणारच नाही. हिंदीतपण "सावन का महिना ; पवन करे सोर्. जीयारा रे झुंमे ऐसे. जैसे मनमा नाचे मोर." किवा पद्मजा जोगळेकर यांच्या आवाजातील "हसरा नाचरा जरासा लाजरा. सुंदर साजिरा,श्रावण आला. ॥ तांबूस कोमल पाऊल टाकीत भिजल्या मातीत श्रावण आला" ॥ हे गीत रेडिओवर श्रावणमहिण्यात वाजलेच पाहिजे असा अलिखीत दंडक आहे. सुषमा सारंग नावाची कवयित्री म्हणते. "आली पावसाची सर चिंब झाले माळरान कण कण मृत्तिकेचा गाऊ लागे धुंद गान.".॥ " श्रावण आला गं सजने श्रावण आला " असे गाणं गुणगुणत कधी फेरधरू लागतात हेच कळत नाही. ? श्रावणाचे आगमन होताच चाहूल लागते ती. सणांची नागपंचमी,रक्षाबंधन,नारळी पौर्णिमा पिठोरी आमावस्या,पोळा,दहीहंडी उत्सवाची.गोपाळकाला घरोघरी पुजल्या जाणा-या मंगलागैरीची.रात्री फेरधरू नाचणा-या माहेरवाशिनींच्या घागरी घुमण्याची.श्रावणात पूर्वी सा-या माहेरवाशिनी माहेरी यायच्या. मग रात्री मंगलागैरीची आरास मांडली जायची.जागरण केले जायचे मग सा-या सया फेरधरून रात्र जागून काढायच्या. झिम्मा फुगडी झपाटा दंडाची फुगडी असे खेळ रात्रभर चालायचे मग उखाण्यांमधून कोडी घातली जायची. एकमेकींना उखाण्यांमधून चिडवल जायचं चूलीवर होता पापड बकूचा नवरा माकड. अशातच फुडीला वेग यायचा मग बकू म्हणत असे कोर बाई कोर चंद्राची कोर मिनीचा नवरा कोंबडीचोर. मग मिनी म्हणायची " माझा नवरा कोंबडीचोर शकूचा नवरा हरामखोर." मग मोठ्याने खिदळण्याचा आवाज यायचा. पुन्हा दुसर्या दोन मैत्रीणी कंबरेला पदर खोचत पुढे व्हायच्या. रात्रभर सख्या सजणी नाचणयात दंग होऊन जायच्या. सासरचे सारे दुःख विसरून डोळ्यात सुख साठवत दंग व्हायच्या. नाना रंगाचे नाना ढंगाचे खेळ रात्रभर व्हायचे. सगळे वातावरण मंगळमय असायचे.घराघरात लावले जाणारे धार्मिकग्रंथाचे पारायणे. हरविजय, पांडवप्रताप,रामायण, महाभारत, नवनाथ कथासार,आदी ग्रंथांची पारायणे व्हायची. सारे भारावून जायचे. कृष्ण जन्म झाला की साखर वाटली जायची .आणि श्रावण समाप्तीला पूजा मग प्रसाद म्हणून जेवणाच्या पंगती बसायच्या .रात्री जगरभजन रंगायचा पोरीसुना माजी घरात फेर धरून गाणी गात नाचायच्या.या वाचण्यात गाणी असायची ती लोकगीते. भाऊ,बहिण,नंदन,भावजय. माहेरवाशीन गाण्यातून आपले सुख दुःख मांडायची.वर्षभराचा क्षिण ती विसरायची.या सुखाच्या साठी ती श्रावणाची वाट पहायची. आपल्या सख्यासजणीला भेटायला ती आतूर व्हायची.असे नाना रंग लोकगीताचे असायचे.

गुरुवार, ३ नोव्हेंबर, २०१६

समस्यांचे आगार जव्हार (1)

दोन हजार पाच मधे ज्युनिअर काॅलेज अध्यापक पदाचे ठाणे जिल्हातील जव्हार या नोकरीच्या ठिकाणी हजार होण्याचे आदेश हाती आले.आणि मनात नसताना काॅलेज मधे हजर झालो.या अगोदर जव्हार बद्दल काही गोष्टी ऐकून होतो.येथे जादू मंतर केले जातात. लोक करणी जादूटोणा करतात. पण हजर झाल्यावर येथील लोकं भोळीभाबडी .वाटली निरक्षर द्रारिद्राने पिचलेली.नि पैशासाठी काबाडकष्ट करणारी दिसली. शिक्षण नसल्यामुळे अंधश्रद्धेचा प्रचंड पगडा जनमानसात आहे. तसेच वेसनधिनता कमालीची आहे. दारूचे वेसन ही येथे सर्वात मोठी समस्या. या मधे लहान मुलं तरूण ते आबाळवृध्द या सगळ्यांचा समावेश आहे हा एक लागलेला शाप आहे. संपूर्ण जव्हार हे उंचावर वसल्यामुळे भौगोलिक दृष्टीने प्रदेश डोंगराल टेकड्या टेकड्यांचा आहे. भात हे मुख्य पिक घेतले जाते.अजून नाचणी हे पीक घेतले जाते. हेच यांचे मुख्य अन्न. मजुरी हा पारंपरिक पैसा मिळविण्याचे साधन.पण मजुरीसाठी ही कुटुंबा स्थलांतरीत होतात. मुंबई ,ठाणे ,कल्याण ,भिंवडी येथे हे मजूर स्थलांतर होतात. प्रश्न निर्माण होतो.मुलांच्या शिक्षणाचा.म्हणून बर्याच पालकांचा ओढा मुलांना शाळेत टाकताना आश्रमशाळेत आसतो.उद्देश रोजीरोटीसाठी बाहेर गेल्यावर मुलांची होणारी ससेहोलपट थांबावी एवढांच असतो. आश्रमशाळेत राज्यातील इतर शाळा मध्ये विद्यार्थी मिळत नाही पण जव्हार मधे आश्रमशाळेत प्रवेश मिळवणे जिकिरीचे होऊन जाते.स्थलांतरामुळे गांवामधे सुनसुनाट असतो.म्हातारे आणि लहान मुलें घरी दिसतात. देश स्वातंत्र्य होऊन साठ पेक्षा जास्त वर्ष उलटली पण या भागात ना पाणी ना दळणवळणाच्या सुविधा ना रोजगार ना उच्च शिक्षणाच्या सुविधा, येथे विद्यार्थींना विज्ञानातून स्नातक व्हायचे असल्यास ठाणे कल्याण मुंबई गाठावी लागते. त्यामुळे कला शाखेत शिकणार्याची संख्या फार .असे कला शाखेत शिकून मजुरी करणार्या सुक्षितांची संख्या खूपच आहे. बारमाही शेती पावसाचे संकट त्यामुळे शेतीतूनही फार काही हाताला लागत नाही. हाताला पैसा नसल्यामुळे पुढील शिक्षण घेता येत नाही. कमालीचे द्रारिद्र त्यामुळे येथील जंगल संपत्तीवर उदरनिर्वाह करतात. आत्ता तर जंगल संपले आहेत. सर्वत्र ओसाड माळरानचे दर्शन होता आहे. जव्हार तालुका हा नवीन तयार झालेल्या पालघर जिल्ह्यात समावेश झालेला शंभर टक्के आदिवासी. लोकसंख्या असणारा तालुका. याठिकाणी अपर उपजिल्हाधिकारी कार्यालय नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून. तात्कालिक सरकारसने निर्माण केले होते. नवीन जिल्हा तयार होताना जव्हार जिल्हा होणे अपेक्षित होते पण कोठे .या विषयावर राजकारण घडले. जव्हार तालुका राहिला.जर जिल्हा झाला असता तर सेवा सुविधांमधे भर पडून येथील आदिवासींच्या पदरात सुखसुविधा पडल्या असत्या. त्यानिमीत्ताने जिल्हा रुग्णालयात आले असते. आरोग्याचा प्रश्नांची तिव्रता कमी झाली असती.आज कुपोषणाचा प्रश्न येथील मोठी समस्या आहे. हाकेच्या अंतरावर जगातील एक महानगर मुंबई फक्त शंभर किलो मीटर अंतरावर आहे. मात्र येथे कुपोषणांने बालमृत्यू होतात ही निंदनिय गोष्ट आहे. पाण्याचे दुर्भिक्ष हे आसमानी आणि बरेचसे सुलतानी संकट.खरे तर येथे धो धो पाऊस कोसळत असतो. पण सरकारी अनस्ता नियोजन शून्यता यामुळे दूरवर पाण्यासाठी पायपीट करावी लागते.मजुरीसाठी जायचं की जगण्यासाठी पाणी आणायचे दोन्ही प्रश्न जीवन मरणाची समंधीत.कधी पाण्यासाठी महिलांना जीवही गमवावा लागला आहे. एका बाजूला रोजीरोटीचा प्रश्न तर दुसरीकडे. पाण्याचा प्रश्न अशा असंख्य प्रश्नांनी येथील नागरिक भरडला जात आहे. खरेतर जव्हार हे ऐतिहासिक गाव. हे एक श्रीमंत संस्थान येथे विक्रम शहा नामक राजा राज्य करीत होता. छत्रपती शिवाजी महाराज सुरतला गेले ते या भूप्रदेशातून. भोपतगड हा एक भुईकोट किल्ला या संस्थानात होता त्याच्या पाऊलखुणा अजुनही साक्ष देतात. इतिहासात या गांवचा उल्लेख अनेक ठिकाणी सापडतो. असे हे संपन्न गांव. ठाणे जिल्हा चे महाबळेश्वर असे लोक म्हणतात. म्हणजे थंड हवेचे ठिकाण आहे. दिवसा याचा प्रत्येय येत नसला तरी. रात्री पडणारा सुखद गारवा शोधून सापडणार नाही. तसे गांव छोटेसे पण निसर्गसौंदर्याने नटलेला भूप्रदेश भोवती आहे. हनुमान पाॅईंट हे जव्हार मधिल सर्वात उंच ठिकाण आजुबाजूच्या निसर्गाचा अस्वाद घेण्याचे ठिकाण. येथून जव्हार च्या राजवाड्यांचे ही दर्शन होते. राजवाडे दोन आहेत. एक नवीन व दुसरा जुना राजवाडा.जुना राजवाडा नामशेष झाला आहे. हा लाकडी राजवाडा कलाकुसर केलेले खांब पूर्ण लाकडाने बाधलेला व वर मोगलोरी कौले आजूबाजूला दगडी तटबंदी असून ही खाजगी मालमत्ता आहे. राजेसाहेबांचे पुर्वजांच्या ताब्यात आहे. दसर्याला येथे मोठी जत्रात भरते.तेव्हा राज्याचे दर्शन नागरिकांना होते एरव्ही राजेसाहेब बाहेर रहातात.