कवी श्री धनाजी जनार्दन बुटेरे आपले शब्दांचा गुलमोहर अनुदिनी वर आपले स्वागत करीत आहे सर्व कविता, लेख, कथा याचे स्वामीत्व हक्क राखून ठेवले आहेत.

शुक्रवार, ४ नोव्हेंबर, २०१६

आठवणींच्या श्रावणसरी (1)

मला श्रावणाचे फार अप्रुप वाटते.सृष्टीचा प्रियकर म्हणजे श्रावण,सृष्टी आताच तारुण्यात आली असा क्षणाक्षणाला भास करून देणारा ,आणि मिलना साठी धरती अतुर असते तो हा श्रावण. हिरवीगार धरा नटून ज्याच्यासाठी तिष्ठत ऊभी असते तो हा श्रावण. अंगाखांद्यावर ईवले ईवले झरे घेऊन त्यांच्याशी खट्याळपणे मस्ती करणारा खट्याळ श्रावण. फुलपंखावर रंग भरून फुलपंखावर बागडणारा श्रावण. रानपाखरांच्या गुंजना मधे धुंद श्रावण. आकाशात सप्तरंगाची कमान ऊभारणारा श्रावण. ऊनपावसाचा खेळ मांडणारा श्रावण. रानफुलांच्या बहराने रानोमाळ फुलांनी फुलकीत करणारा श्रावण. हजारो इवली इवलेसे रानफुले धरतीच्या कुशीतून हळूच डोके वर काढून सृष्टीचा चैतन्य प्राप्त करून देणारा श्रावण. कवीच्या शब्दांना कागदावर सांडणारा श्रावण. कवीजनांचे आणि श्रावणाचे फार सौख्य. श्रावण झरला की कवी ही शब्दात झरल्या शिवाय रहात नाही. बालकवी ची " श्रावणमासी हर्षमानसी, हिरवल दाटे चोहिकडे क्षणात येते सरसर शिरवे क्षणात फिरूनि ऊनपडे ॥ वरती बघता इंद्रधनु चा गोफ काय तो विणलासे मंगल तोरण काय बांधले नभी मंडपी कुणी भासे ॥ ही कविता अबालवृद्धांन पासून आजच्या पीढीला तोंड पाठ नसली तर नवलच. तर बा.सी मर्ढेकर श्रावण वेगळ्या पध्दतीने चितारतात.ते म्हणतात. आला आषाढ श्रावण आल्या पावसाच्या सरी किती चातक छोटीने प्यावा वर्षाऋतु तरी! मर्ढेकर श्रावणाची चातकाने प्रमाणे वाट पहातात. श्रावणात घननिळा बरसला रिमझिम रेशमधारा. उलगडाला झाडातून अवचित मोर पिसारा हे गीत श्रावणात रेडिओवर नाही वाजले तर श्रावण येणारच नाही. हिंदीतपण "सावन का महिना ; पवन करे सोर्. जीयारा रे झुंमे ऐसे. जैसे मनमा नाचे मोर." किवा पद्मजा जोगळेकर यांच्या आवाजातील "हसरा नाचरा जरासा लाजरा. सुंदर साजिरा,श्रावण आला. ॥ तांबूस कोमल पाऊल टाकीत भिजल्या मातीत श्रावण आला" ॥ हे गीत रेडिओवर श्रावणमहिण्यात वाजलेच पाहिजे असा अलिखीत दंडक आहे. सुषमा सारंग नावाची कवयित्री म्हणते. "आली पावसाची सर चिंब झाले माळरान कण कण मृत्तिकेचा गाऊ लागे धुंद गान.".॥ " श्रावण आला गं सजने श्रावण आला " असे गाणं गुणगुणत कधी फेरधरू लागतात हेच कळत नाही. ? श्रावणाचे आगमन होताच चाहूल लागते ती. सणांची नागपंचमी,रक्षाबंधन,नारळी पौर्णिमा पिठोरी आमावस्या,पोळा,दहीहंडी उत्सवाची.गोपाळकाला घरोघरी पुजल्या जाणा-या मंगलागैरीची.रात्री फेरधरू नाचणा-या माहेरवाशिनींच्या घागरी घुमण्याची.श्रावणात पूर्वी सा-या माहेरवाशिनी माहेरी यायच्या. मग रात्री मंगलागैरीची आरास मांडली जायची.जागरण केले जायचे मग सा-या सया फेरधरून रात्र जागून काढायच्या. झिम्मा फुगडी झपाटा दंडाची फुगडी असे खेळ रात्रभर चालायचे मग उखाण्यांमधून कोडी घातली जायची. एकमेकींना उखाण्यांमधून चिडवल जायचं चूलीवर होता पापड बकूचा नवरा माकड. अशातच फुडीला वेग यायचा मग बकू म्हणत असे कोर बाई कोर चंद्राची कोर मिनीचा नवरा कोंबडीचोर. मग मिनी म्हणायची " माझा नवरा कोंबडीचोर शकूचा नवरा हरामखोर." मग मोठ्याने खिदळण्याचा आवाज यायचा. पुन्हा दुसर्या दोन मैत्रीणी कंबरेला पदर खोचत पुढे व्हायच्या. रात्रभर सख्या सजणी नाचणयात दंग होऊन जायच्या. सासरचे सारे दुःख विसरून डोळ्यात सुख साठवत दंग व्हायच्या. नाना रंगाचे नाना ढंगाचे खेळ रात्रभर व्हायचे. सगळे वातावरण मंगळमय असायचे.घराघरात लावले जाणारे धार्मिकग्रंथाचे पारायणे. हरविजय, पांडवप्रताप,रामायण, महाभारत, नवनाथ कथासार,आदी ग्रंथांची पारायणे व्हायची. सारे भारावून जायचे. कृष्ण जन्म झाला की साखर वाटली जायची .आणि श्रावण समाप्तीला पूजा मग प्रसाद म्हणून जेवणाच्या पंगती बसायच्या .रात्री जगरभजन रंगायचा पोरीसुना माजी घरात फेर धरून गाणी गात नाचायच्या.या वाचण्यात गाणी असायची ती लोकगीते. भाऊ,बहिण,नंदन,भावजय. माहेरवाशीन गाण्यातून आपले सुख दुःख मांडायची.वर्षभराचा क्षिण ती विसरायची.या सुखाच्या साठी ती श्रावणाची वाट पहायची. आपल्या सख्यासजणीला भेटायला ती आतूर व्हायची.असे नाना रंग लोकगीताचे असायचे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा