शुक्रवार, ४ नोव्हेंबर, २०१६
आठवणींच्या श्रावणसरी (2)
माझ्या श्रावण लक्षात आहे तो लहान पाणी केलेली मौजमजा दंगामस्ती साठी. श्रावणाची चाहूल लागायची ती गावातील फक्त आमच्या घरी रात्री जेवनखाणं ऊरकली की पोथी वाचण्याचा कार्यक्रम होत असे मग पोथी ऐकणारामधे जास्त सहभाग म्हातार्या माणसांचा असे. मला महाभारतातील कथांचा परीचय या वयात झाला.माझ्यासाठी ही पर्वणीच असे.कारण गोष्टी ऐकायला मिळायच्या. नागपंचमी झाली की; ओढ लागायची "दहीहंडीची" कारण आमच्या गावात दहीहंडी उत्सव वेगळ्या प्रकारे साजरा होतो. सप्तमीला कृष्ण जन्माचे जागरभजन भजन रात्री बारा पर्यंत चाले.मग कृष्णजन्माचा सुंटवडा हातात पडे की मग उपवास सुटत असे. वर्षातून फक्त याच दिवशी बारा नंतर जेवण केले जाई.दुसरा दिवस उजाडला की मंदिरात गावकरी जमत मग भजन होई.आणि मग कृष्णजन्माची मिरवणूक गावात टाळमृदूंगाच्या साथीने निघत असे.पालखी नसायची की पताका फक्त भिजणारे आणि भिजवणारे ऐवढेच मिरवणूकीत असे.आम्ही चिल्लेपिल्ले उड्या मारत पावसात भिजत घोरोघरी पाणी पाणी ओरडत बोंबलत असू.मग आबाळवृध्द, वृध्द घरात घुसून सर्व पाणी मुलांच्या अंगावर फेकत .कुठे कुठे पोह्यांचा प्रसाद वाटला जाई.आम्ही शेण चिखल एकमेकांच्या अंगावर फेकत गोंगाटकरत उत्सव साजरा करत असू.भजनकरी हळूहळू पुढे सरकत. एखाद्या घरासमोर दहपंधरा फुटांवर दहिहंडी बांधलेली असायची. मग त्या ठिकाणी फक्त आमच्या गावात जे पारंपरिक टिपरीनृत्य आहे ते रिंगण करून लहान मोठे म्हातारे सहभागी होत नाचत असत.या नृत्याचे एक वैशिष्ट्य आहे जो पखवाज वाजवण्यासाठी वाकबगर आहे. तोच हे वाजवत असे कारण वाजवणारा व नाचकरी यांच्यात जुगलबंदी चालायची.
धिणां धिणा धिण्णा धिंण
धिणां धिणा धिण्णा धिंण
असे बोल पखवाज वाला काढी. पुढे वेग वाढत जायचा नाचणा-यांचे पायांना गती यायची.आम्ही ती जुगलबंदी पाहून दंग होत असू.चार पाच नाचण्याचे प्रकार होत.ही वृत्ते गवळणी या प्रकारावर केले जाई.
मग संत तुकाराम यांचा अभंग चालू होई.
लहान थोर पाहू नका
तुका म्हणे हुंडी ठोका.
असे म्हणताच आमची चलबिचल सुरू व्हायची ती तिस-या थरावर चढून हंडी फोडण्यासाठी. हे थर लहान मुलांना घेऊन लावले जातात. दोन तीन वेळा थर कोसळत मग कुणाचे तरी डोके फुटे.मी वर जावा म्हणून धडपडत असायचो.कधी तरी प्रयत्न यशस्वी व्हायचा. मी वर जाऊन हुंडी फोडली हे वर्षभर. मुलांना सांगायचो.हा क्षण मला वर्षभर पुरायचा.हंडीफुटली की खालच्या थरावरील मूलं हातसोडून देत मग आम्ही वरच्या थरावरील मूलं धडाधड खाली कोसळत असायचो.लागायचं खरचटले जायचे. पण पडण्यापेक्षा हंडी फोडण्याचा आनंद काही औरच.दहीहंडी फुटायची आणि मग खेळ रंगायचा तो भिजण्याचा ज्या घरातील हंडी असे त्या घरातील सर्वच पाणी बाहेरील गोविंदावर फेकले जायचे.गोविंदा,गोविंदा,असा जयघोष व्हायचा. त्या वेळी घरं ही कुडांची व खाली जमिनी असायची. घरात जमीन भिजून जायची कोरडी जागा जरा सुद्धा नसायची पण घरात "गोकूळ" नाचले म्हणून घरमालकीण धन्य व्हायची. मिरवणुक पुढे सरकत जाई.गावात शेणमिश्रित पाण्याचे पाट वहायचे. गाव नि माणसं चिंब होत. गोकुळ नाचून मंडळी परत मंदिरात यायची. तेथून मोर्चा धळायचा तो विहीरीवर फक्त आजच्याच दिवशी या विहीरीत उड्या मारण्याची मुभा असायची.मनसोक्त उड्या मारून झाल्या कीं पाय घराकडे वळायचे. गोड आठवणी डोळ्यात साठवत. गोविंदा रे गोपाळाा .म्हणत उड्या मारत आमची स्वारी घराकडे परतायची.
श्री धनाजी जनार्दन बुटेरे
मु.पोई ; तालुका :- कल्याण ; जि.ठाणे .
421103
djbutere@rediffmail.com
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा