कवी श्री धनाजी जनार्दन बुटेरे आपले शब्दांचा गुलमोहर अनुदिनी वर आपले स्वागत करीत आहे सर्व कविता, लेख, कथा याचे स्वामीत्व हक्क राखून ठेवले आहेत.

मंगळवार, २२ नोव्हेंबर, २०१६

कविता कशी तयार होते. (एक कविता )

माझी कविता

येई पावसाची सर ;
गंध मातीतून सुटे.
तशी मनाच्या गाभारी ;
कविता मज भेटे ॥

पायी बांधुनिया चाळ ;
कधी रुणुझुणु पैंजण.
माझी कविता येते ;
माझी बनून साजन. ॥

कधी दवाचा दहीवर ;
कधी पळसाचा बहर.
होते खट्याळ कविता ;
सैरभैर अंगभर. ॥

कधी कान्हाची बासरी ;
कधी कंचुकीची गाठ.
माझी कविता दाविते ;
कधी रुसुनिया पाठ ॥

कधी दीनाची झोपडी ;
कधी महालाची दाशी.
कधी रांगत रांगत ;
माझी कविता दाराशी. ॥

कधी सूर्य होऊनिया ;
क्षितीज कवे घेते.
कधी स्फुंदत रुसत ;
कविता साज लेते . ॥

फुलपाखरा सारखी.
भिर्रभिर्रते रानात.
दारी कोकीळा गाते.
माझ्या कविता मनांत. ॥

कधी पाऊस रानचा ;
कधी शेतातला भात.
माझी कविता येतिया
ओठातून गात गात. ॥

                   ✒ प्रा.श्री.धनाजी जनार्दन बुटेरे
                       पोई ; कल्याण; ठाणे.   
                     djbutere@blogspot.com
                          (C) :- Copyright

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा