कवी श्री धनाजी जनार्दन बुटेरे आपले शब्दांचा गुलमोहर अनुदिनी वर आपले स्वागत करीत आहे सर्व कविता, लेख, कथा याचे स्वामीत्व हक्क राखून ठेवले आहेत.

शनिवार, ९ डिसेंबर, २०१७

सामर्थ्य आहे चळवळींचे

                          विविध क्षेत्रांतील चळवळीनी नेमकी  काय केले?"सामर्थ्य आहे चळवळींचे जो जे करील तयांचे ."असे संत रामदास स्वामी म्हणतात.खरोखरच चळवळी मध्ये सामर्थ्य आहे.आज असंख्य वेगवेगळ्या क्षेत्रामधे. आपल्या न्याय व हक्कासाठी तसेच समाज उत्थान. घडविणा-या चळवळी उभ्या आहेत. त्या किती प्रमाणात स्वतःशी प्रामाणिक आहेत या यक्ष प्रश्न आहे. जेंव्हा चळवळ उभी रहाते उद्देश फार प्रामाणिक असतो. पण नंतर चळवळ वेग घेऊ लागली की चळवळेतील नेते मंडळी सरकार च्या दावणीला बांधले जातात,किंवा विकले तरी जातात .चळवळ उरते नावा पुरती.शरद जोशींची शेतकरी वर्गाच्या हितासाठी शेतकरी संघटनेची बांधणी केली.तिचा परिणाम ही दिसू लागला.पण कुठे पाल चुकचूकली कुणास ठाऊक? .नवीन संघटना तयार झाल्या नि चळवळ पुढे सरकू शकली नाही. खरे तर सर्वात असंघटीत घटक म्हणजे शेतकरी. असंख्य मागण्या आहेत त्याची ही गरज आहे. पण शेतकरी एकसंघ राहू शकला नाही. परिणामतः सरकायचं फावलं नि शेतकरी देशोधडीला लावलं.कामगार हितासाठी संघटना हवीच पण असंख्य संघटना त्यामुळे कामगार आजही असंख्य मागण्या पासून उपेक्षित आहे. काही कामगार नेते सरकारचे मांडलिक झाले. आणि चळवळीची वाट लागली. आज सरकार विरोधात निघणारे मोर्चे कष्टकरी वर्गात किती असंतोष आहे. हे संगतात.
             विद्यार्थी चळवळ अपेक्षित यशस्वी झाल्या नाहीत. या चळवळी राजकीय पक्षांचे स्टॅप घेऊन. उतरू लागल्या. परिणामतः विद्यार्थी चळवळ ही हवी त्या गतीने पुढे जाऊ शकली नाही. प्रस्थापित सरकार विरुद्ध विद्यार्थी असाच संघर्ष पाहायला मिळतो .त्यात विद्यार्थी राजकीय झेंडे घेऊन उतरले."विरोधासाठी विरोध.की गरजेसाठी विरोध." हे एक कोडे आहे.राजकारणी विद्यार्थ्यांचा अपमतलब म्हणून वापरू लागले.
               साहित्यात  ही चळवळी आल्या. जाती धर्मानुसार पुढे प्रवाह वाढले.प्रांतिय स्वरूप प्राप्त झाले. मग पुन्हा. विदर्भ, मराठवाडा, कोकण,यामध्ये वेगवेगळे गटतट तयार झाले.खरे तर साहित्य चळवळी वाढणे म्हणजे समाज उत्थान घडविणे हा मुख्य उद्देश होता. त्यातून वैश्विक साहित्याची निर्मिती व्हावी.जनमानसात साहित्याची चर्चा व्हायला हवी पण तसे होताना दिसत नाही. काही साहित्य चळवळी केवळ नावापुरत्या आहेत. काही पुरस्कार देण्यापुरत्या बरं पुरस्कार लायक साहित्यिकाला द्यावा पण येथे वशिल्याने पुरस्कार वाटले जातात. काही चक्क विकतात.नि दस्तूरखुद्द आमचा साहित्यिक ते पुरस्कार विकत घेतात सुध्दा. काही साहित्यिक संस्था आपल्या जवळच्या साहित्यिकाला पुरस्कार वाटतात.तू ओळखिचा तू जवळचा असे पुरस्कार स्वतःची आणि चळवळीची हानी करून घेतात.चळवळीचा उद्देश दूर रहातो नि चळवळ वांझोटीच रहाते.
                       मराठी माणसांच्या हक्कासाठी शिवसेना ही राजकीय चळवळ उदयास आली. काही अंशी मराठी माणसांना ती आपली वाटली.पण चळवळीचा हवा तसा मराठी माणसांनी हात दिला नाही. त्यातून ही राजकीय चळवळ.कुणाला रुचली.कुणाला पचली नाही.राजकीय चळवळ त्यामुळे सगळ्या मराठी माणसांचा पाठींबा लाभला नाही. आणिआपणा सर्वांना महीत आहेच पुढे काय झाले? त्या ही पुढे महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही राजकीय चळवळ मराठी माणसांच्या हक्कासाठी नवीन पक्ष म्हणून उभी राहिली.येथे ही मराठी माणूस या चळवळी पासून दूर गेला.राज ठाकरे या मराठी माणसांला ऐकायला लोक लाखोच्या संख्येने येतात पण मतपेटी मात्र रिकामी रहाते.येथे राज ठाकरेंना मत दिले म्हणजे चळवळ यशस्वी झाली असं मला म्हणायचे नाही. तर किती मराठी अस्मितेचे प्रश्न सुटतात या वर या चळवळीचे यशापयश अवलंबून आहे.
                    थोडक्यात काय चळवळींचे यशापयश. त्यात काम करण्या-या कार्यकर्त्यांच्या हातात आहे.पुरस्कारा.दिल्याने ती संस्था मोठी होत नाही. तर ती व्यक्ति त्या संस्थेला मोठी करते. दिडदमडीला जे कामगार नेते विकले जातात. त्या कामगार चळवळींचे भविष्य अंधःकारमयच .खरी सचोटी नि प्रामाणिकपणा हा चळवळींचा आत्मा असतो.आणि हे जर चळवळीतील कार्यकर्त्यांकडे नसेल तर चळवळ वांझोटीच. म्हणून आम्हाला आजच्या चळवळी काहीच देऊ शकल्या नाही हे माझे प्रामाणिक मत आहे.

प्रा.श्री.धनाजी जनार्दन बुटेरे
मु. :--पोई, पो. :-- वाहोली.
ता. :--कल्याण,जि.ठाणे.

शुक्रवार, २९ सप्टेंबर, २०१७

हे ऐकून मातृभूमी



हे ऐक मातृभूमी

ते तुझ्याचसाठी लढले
ते तुझ्याच साठी घडले
ते धारातिर्थी पडले.
हे ऐक मातृभूमी. .

सोडले माय ते बंध
मनी ध्यास तुझा तो छंद
उठले कराया बंड
हे ऐक मातृभूमी.

डोळ्यात त्यांच्या पाणी
ते तुझीच गाती गाणी.
फासावर जातो कोणी.
हे ऐक मातृभूमी.

इनक्लाब होता नारा.
रक्ताच्या वाहिल्या धारा.
आता नाही तयांचा पहारा.
हे ऐक मातृभूमी.

आवळला फाशीचा दोरं
लढले थेथील विर
पाठीशी होते थोर.
हे ऐक मातृभूमी.

तुम्ही स्मरा त्यांची स्मृती
मग येई तुम्हाला स्फूर्ती
ही पावन होईल  धरती
हे ऐक मातृभूमी.

=============================

प्रा श्री धनाजी जनार्दन बुटेरे
मु.पोई पो. वाहोली.
ता. कल्याण ठाणे
421103
फोन 9930003930
What,a app.9404608836

==============================


बुधवार, २७ सप्टेंबर, २०१७

कवडीमोल

कवडीमोल

धनी राबतो कष्टतो,
तरी पोटभर नाही.
किती गाळतोया घाम,
सारे महागाई खाई. ॥

कसं जगावं गरिबांनी,
पोट जाळत जाळत.
जगतोया कसाबसा,
आसू ढाळत ढाळत. ॥

राब राबतो शेतात,
महागाई करी स्वाहा.
अरं येड्या सरकारा,
एक येळ तरी पहा.॥

धनी जगाचा पोशिंदा,
पिकवतो दौलत.
जवा बाजारात उभा,
त्याची वंगाळ हालत.॥

माझ्या धन्याची दौलत,
शेतीमाळ कवडीमोल.
सारी कडे महागाई,
दुःख काळजात खोल.॥

प्रा श्री धनाजी जनार्दन बुटेरे
मु.पोई ,पो.वाहोली,
ता.कल्याण, जि.ठाणे,
फोन. 9930003930

शुक्रवार, ७ जुलै, २०१७

वसंत बहर

*वसंत बहर*

पानापानात हिरवळ.
गंध वाटेवर सांडे.
रंगारंगात गुलमोहर
काय रंगांचे ते लोंढे

रान पांघरून शाल
हिरवा रानात बहर.
मऊ लुसलुशीत दुलई
आत कोकिळेचा स्वर.

नवचैतन्य झाडीला
झाडझाड नवेकोरे
कसे नटले सजले
उभे पानझडी खोरे.

घुमे पाखरांचे स्वर
रान जाई वेडावून.
ठायी ठायी सांडलेली
पाखरांची वेडी धून.

कशा कोरल्या रानात
वाटे वाटे वर नक्षी.
घेई आकाशी भरारी
सुखावला रान पक्षी.

*प्रा.श्री.धनाजी जनार्दन बुटेरे*
      *पोई कल्याण ठाणे*
      दि 29/5/17 पोई

कत्तल मराठी कविता

1)    कत्तल

अरं मानसा मानसा
कापलीत किती झाडे.
आता उरलेत फक्त
झाडांचेच शुष्क मढे.

असा कसा रे माणूस
पायी चालणेच नाही
गाडी उडवी धुराळा.
धूर सोडतच राही.

झाला सूर्य बाप लाल
माती माय लालेलाल .
शेतकरी पहातो वाट
शेता उन्हाची काहील.

अरे मानवा मानवा
तुला प्लास्टिकचा लळा.
माती झालीया दूषीत
जगायचा कसा मळा.

आती वापर खताचा
जमीन झाली वांझोटी.
कशी प्रसवल पीक
कशी फुलेल रे ओटी.

रसयनाचा फवारा
उडवतो तू शिवारा.
फुलव शेंद्रीय शेती
परत रे तू माघारा.

अरे मानसात मानसा.
बिघडला निसर्ग सारा.
कसा चालायचा बाप्पा
सृष्टीचा मोठा पसारा.

श्री धनाजी जनार्दन बुटेरे
मु :-पोई ,:-  ता. :- कल्याण, :-  जि.:- ठाणे

2)    बा मानवा.!

बा मानवा!
फिरवले तू सृष्टीचे चक्र.
तुझ्या हव्यासा पायी.
तू केलीस कत्तल
झाडांची,पहाडांची.
नग्न केलीस जमिनीला
आणि करत राहीलास तू
तिच्यावर अनंत बलात्कार.
ओतत राहीलास.
तिच्या गर्भात रासायनिक खते.
तीने प्रसवावे हजारो कौरव म्हणून.
तिच्या लेकरांवर
करत राहीलास
विष प्रयोग .
पण ती वाझोंटी झाली.
तरी ही तू करत राहीलास
पुनःपुन्हा बलात्कार.
आता ती असाह्य आहे.
दुर्लक्ष केलंय तिने लेकरांवर.
पण तुझी बलात्कार करण्याची
हौस भागलीच नाही.
तू चिरतोस रोजचे तिचे ह्रदय.
आणि काढतोस सिझर करून बाळ
तिच्या पोटातून.
पर्वत स्थनमंडले
छाटलीस तू सुर्पनखे सारखी.
ती विद्रूप झालीय.
पुतना मावशी सारखी.
तू विद्रूप झाल्यावर ही
करत राहीलास बलात्कार.
असंख्य वेळा.
ती फक्त सोसते आहे
मरनयातना कारण
तुझा शेवटपण तिच्या
शेवटात आहे
तू विसरलास.
करत रहा तू बलात्कार.
तुझी भूक थोडी शमणार आहे.

प्रा श्री धनाजी जनार्दन बुटेरे
     पोई कल्याण ठाणे
What's app n.9404608836
फोन :-9930003930
ईमेल :- dbutere@gmail.com

परीचय

श्री धनाजी जनार्दन बुटेरे
मु. :- पोई ; पोस्ट :-  ता.:-  कल्याण ;  जि.:-. ठाणे






वसंत बहर

*वसंत बहर*

पानापानात हिरवळ.
गंध वाटेवर सांडे.
रंगारंगात गुलमोहर
काय रंगांचे ते लोंढे

रान पांघरून शाल
हिरवा रानात बहर.
मऊ लुसलुशीत दुलई
आत कोकिळेचा स्वर.

नवचैतन्य झाडीला
झाडझाड नवेकोरे
कसे नटले सजले
उभे पानझडी खोरे.

घुमे पाखरांचे स्वर
रान जाई वेडावून.
ठायी ठायी सांडलेली
पाखरांची वेडी धून.

कशा कोरल्या रानात
वाटे वाटे वर नक्षी.
घेई आकाशी भरारी
सुखावला रान पक्षी.

*प्रा.श्री.धनाजी जनार्दन बुटेरे*
      *पोई कल्याण ठाणे*
      दि 29/5/17 पोई

बुधवार, १० मे, २०१७

साठीतील विजनवास

साठीतला विजनवास

                       भारतीय संस्कृती महान आहे. या संस्कृतीने "मातृपितृ देव भव"आईवडिलांना देवाचे स्थान दिले आहे. जगातील कोणत्याच संस्कृतीने एवढे मोठे स्थान आईवडिलांना दिले नाही. पण हीच संस्कृती आमची तरूण मंडळी विसरत चालली आहे. वृध्दाश्रम हे या तरुण पिढीने जन्मला घातलेले दैत्य. आपले सुख त्यागून जे सतत लेकरासाठी झटतात.लेकराच्या सुखात जे आपलं सुख मानतात ते आईबाबा.जो मुलगा पाहिजे म्हणून देवाला नवससायास करतात. कधी जन्म येणा-या मुलीची हत्या करून आपल्या डोक्यावर ब्राह्महत्येचे पातक घेतात ते आईबाबा. घरात वंशाला दिवा हवा म्हणून अनेक दिव्यातून जातात ते आईबाबा. म्हातारे झाले की आम्हाला अचानक नावडू लागतात. आणि आईबाबांची रवानगी होते वृध्दाश्रम नावाच्या तुरूंगात का?
                        असंख्य उत्तरे आहेत. मुलगा सून दोघेही नोकरीला असतात. किंवा मुलगा बाहेर देशात असतो.घर छोटंसं असते.सासूबाई सुनबाई कुणी तरी भांडकुदळ असतात. आईवडिलांची काळजी घेणारा कुणी नसतो.किंवा वंशाच्या दिवाच नसेल.कदाचित काही ठिकाणी ईभ्रतीचा प्रश्न असतो. म्हणजे घरात पाॅश  पाहुणे येतात. त्यांच्या पुढे म्हातारे आईबाप कसेबसे वाटतात म्हणून वृध्दाश्रमात सोय होते.
        पण वरील ब-याच प्रश्नांनांच्यामुळाशी पैसा नावाची आभिलाशा आहे. त्यामुळे आम्हाला आमचे जन्मदाते सुध्दा गौण वाटायला लागतात. पैशाची भूक फार भयंकर असते .माझ्या तरी पाहण्यात अशी व्यक्ती नाही ,ज्याची तृष्णा शमली आहे. अंबानी आडानी मल्या सारख्या नवकोटनारायनांची भूक शमली नाही जे आज जगातली दहा श्रीमंत पैकी एक आहेत. पैसा मानसाला आईवडिलांना सोडायला लावतो.आणि तो दूरवर मानसाला घेऊन जातो. आणि मातीची नाळ तोडून टाकतो.तो नाती ही तोडतो.नि सख्खा भाऊ वैरी होतो.
              आम्हाला दोन दिवसांपूर्वीची घरात आलेली  पत्नी आवडू लागते.तिने सांगितलेल्या गोष्टी आम्हाला ख-या वाटू लागतात. आईपेक्षा बायकोवर जास्त विश्वास बसतो.क्षणात आई कैकयी वाटू लागते.बायकोसाठी आमची जान हजीर असते.आईपासून मुलगा दूर जातो.कालपरवा आईच्या मागे फिरणारा बायकोच्या मागे घुटमळत फिरतो. काळजाचा तुकडा दूरदूर जाऊ लागतो.मग घरात संघर्ष सुरू होतो.बायको जिंकते .घरात खटके नको म्हणून आईबरोबर वडील पण वृध्दाश्रमात आपलं राहिले आयुष्य कुंठीत बसतात.आयुष्यभर काडीकाडी जम झाली की आपण कमविलेले सारे वैभव ती काळजावर दगड ठेऊन सोडून येते.कुणी तरी अमेरिकेत रहातो म्हणून आईवडिलांना येथे सोडतात.कुणी घरात अडचण नको म्हणून आईवडिलांना येथे सोडतात. वृध्दाश्रमात कुणीच खुशीत येत नसतो.पण नियतीने वाढलेले पूर्वसंचित म्हणून गुमान सहन करतात.
       खरंतर आयुष्यभर आईबांनी पै पै जमवून   घर ऊभे केलेले असते.  राबराब राबतात.सकाळी सहा वाजता घरातून निघालेला बाप रात्री उशिरा यायचा. तो रात्री  उशिरा घरात यायचा. झोपलेली लेकरं पाहून हिरमूसळा व्हायचा  मुलांशी खेळायला विसरायचा. बोलायला विसरायचा. धड बायको बरोबर तो बोलत नसायचा."मुलं मोठी झाली की आपण असं करू, तसंकरू "" अशी स्वप्नं तो पाहायचा. खरं तर आईबाबा जगायचं राहून गेलेले असतात."मूलं मोठी झाली की..."हे त्याचे वाक्य अखडले जाते.आता त्यांना खूप बोलायचे असते पण कुणाशी बोलणार. या मुक्या भिंतीबरोबर की स्वतःबरोबर.पण स्वतःबरोबर बोललं की लोक त्याला वेडा म्हणतात. आयुष्यात सोसलेत ते सांगायचे असते त्यांना मुलाला सुनेला. शेजारीपाजारी बरंच सांगायचे असते. आता कुणाला सांगायचे. देवपूजा करायची असते;मनसोक्त जी नेमकी घाईघाईने केली जायची. नातेवाइकांच्या लग्नात मिरवायचे असते.पारावरती जाऊन गप्पा झाडायच्या असतात. कधी तरी मित्रांबरोबर चावट बोलायचे असते.आता ते सारे राहीले होते.
            प्रत्येक आईवडिलांची एक तीव्र  ईच्छा असते. नातुला मांडीवर घेऊन त्याला खेळवावे.त्याचे ईवले ईवले हात धरून गल्लीत फिरवावेत.त्याला रामायण महाभारतातील गोष्टी सांगाव्या.कधी तरी नातवाने धोतर छराब करावे आणि मुलगा आला की त्याला सांगवे "अरे आज ना बाळाने माझे धोतर खराब केले.'" ; तू पण असाच होते हो.' नातवाल आंघोळ घालावी त्याची दृष्ट काढावी असं सगळ्याच आजींना वाटतंय .पण आज ते आसतात माणसकीच्या कैदेत आपल्या मुलाने बापासाठी तयार केलेली.  काही आईबाबांच्या वाट्याला आपल्याच घरात विजनवास आलेला असतो. कारण घरात छान छान पाहुणे येतात.मग त्यांच्या समोर म्हातारे आईबाप कसे बर वाटतात.?म्हणून म्हाता-या आईबाबांना घरातील एक खोली दिली जाते. ती खोली म्हणजे त्या लाचार जीवांचे विश्व. तेथेच खाणेपिणे,तेथेच गप्पा नि तेथेच सारे आयुष्य ही जीव जगतात.
                 खूप वर्षांपासून पै पै जमवून घर ऊभे केलेले असते.खिशाला मुरड घातलेली असते.तोंड शिकवलेले असते. स्वतःसाठी कारभारणी काही घेतले नसते.
आता थोडी उधळपट्टी करायची असते.कीर्तणाला जायचं राहीलेले असते.पत्यांचेडाव रंगवायचे असतात. पण कुणाशी बरोबर पत्ते खेळायचे. आईवडिलांनी. मग काय करणार हे म्हातारे जीव शून्य नजरेतून बाहेरचे जग न्याहाळत असतात.मृत्यूची वाट पहात.पण दोघांनाही भीती असते. आपल्या नंतर ही किंवा हा कसा जगले.तोंड असून बोलता येत नाही. दात असून खाता येत नाही. डोळे असून
पहाता येत नाही. जगणं फार भयाण असते.स्वतःच्या घरात ते पाहुणे असतात.डोळ्यांच्या खाचा करून करून फक्त ते मृत्यूची वाट पहात असतात. मृत्यू ही त्यांना छळत असतो.तो येतच नाही मग जगणं अजूनच कठीण होते. ते रोज वाट पहातात पण तो येत नाही.
         एकीकडे शरीर साथ देत नाही तर दुसरीकडे आमच्याच हाडामासाचे गोळे आमच्या रक्ताने थेंब आम्हाला छळत असतात. अशा वेळी हे यमदेवता तू का बरं आम्हाला प्रसन्न होत नाही असे ते देवाला विनवत असतात.
      खरं तर ही त्यांच्या आयुष्याची ती सुरेख संध्याकाळ असते.पण ती रोजच भयाण होत जाते.
नाती तकलादू होतात.प्रेम तकलादू होते. म्हातारे आईवडील म्हातारा पणात काय मागतात हो.दोन प्रेमाचे शब्द थोडी चिमूटभर सहानुभुती. थोडासा आदर नि आभाळभर माया.जी त्यांचा नातू देणार असतो.दुखले खूपले तर मुलाने आपुलकीने विचारावे " बाबा बरे नाही  वाटत?" बस्स म्हातारे आईबाप पैशावर नाही प्रेमावर जगत असतात. शेवटी आपण काय तारुण्यात कायम राहणार नाही. आपल्या ही वाट्याला म्हातारपणी येणारचं.मग तौमची मुलंही तुमचा कित्ता गिरवणा नाही या भ्रमात राहू नका. कारण तो ही एक संस्काराचा भाग आहे. ते तुमच्या मुलांवर नकळत होणारच.ते थोड्या दिवसाचे पाहुणे आहेत. ते अचानक जातील एक दिवशी. ...

प्रा.श्री. धनाजी जनार्दन बुटेरे
   पोई कल्याण ठाणे

शुक्रवार, २८ एप्रिल, २०१७

तुम्ही what's app वर आहात का?

एखादा जुना मित्र अथवा ओळखीचा चेहरा दिसला की सहज थोड्या गप्पा होतात मग एक प्रश्न विचारला जातो. "तुम्ही what's App वर आहात का ?" झालं बोलणं आपोआप आखडलं जातं.पुढे एकमेकांचा नंबर घेतला जातो काल भेटलेल्या मित्रा कडून "Hi" संदेश येतो.आपण पण हाय~~" असा प्रतिसाद देतो.अधेमधे एखादा गुळमुळीत झालेला संदेश काॅपी पेस्ट करून धाडतो.समोरून ही मचूळ सगळ्या ग्रुप वर चोथा झालेली कविता येथे.पुढे अशीच गर्दी व्हाटस्अप वर वाढत जाते. नाती तयार होतात. वेगवेगळे ग्रुप तयार होतात. आपण त्या समुहाचे सदस्य होतो.येथे नवीन काय काहीच नसते.फेसबुकचे फोटो. येथे येतात येथून तेथे जाणार. काॅपी पेस्ट स्वनिर्मित असे काही नसते. काही काम नाही मग द्या शुभेच्छा. सकाळ, दुपार, संध्याकाळ, रात्री,इतकंच काय रविवार च्या पण शुभेच्छा येतात. जशी मानसांना किंमत नाही तसंच शुभेच्छांचं झालय.फक्त वेळ घालवूपणा चालू आहे. शुभेच्छांना किंमत उरलेले नाही. दिवसभर माणूस वाॅटस अॅप मधे दंग असतो.दूरच्या माणसांशी बोलत असतो.आणि जवळ असणा-या माणसांशी बोलायला त्याला वेळ नाही किती अजब गोष्ट पहा. बरं वाॅट्स अॅप वर समूह एवढे की मोजता येत नाही. बरं समुहावर काय नवीन काहीच नाही दुनिया गोल आहे हे सिध्द होणारी गोष्ट कारण एखादा चांगला मजकूर आपण पाठवला की काही दिवसात तो पुन्हा आपल्यालाच येतो.तेच फोटो तेच शब्द तेचा मजकूर .बरं काही समुहात अश्लीलता एवढी असते की सांगता सोय नाही. आपण किती निर्लज्ज आहोत. की दुस-याला काय पाठवावे तेही आम्हाला कळत नाही. बरं जे जोक येतात ते थोरांच्या नावाने. आपण आपल्याच महान पुरुषांशी विटंबना करतो हेही आम्हाला कळत नाही. . मित्रहो माणसं जोडा संगळ्यांबरोबर बोला विचारांची देवाने घेवाण होऊद्या.प्रत्येकाचे विचार वेगळे आपण आपले विचार दुसर्यावर लादू नका. मी म्हणतो तेच खरे हा हट्ट सोडा.दुसर्याचे चांगले विचार त्यांच्या नावासह पाठवा .साहित्यचौर्य हा गुन्हा आहे. शेवटी खोटेपणा उघड होतोच. चांगल्या ग्रुप वर याची चर्चा होतेच. प्रत्येकाला आपला धर्म प्रिय आहे. कारण नसताना इतिहास दूषित करू नका. खोटं लिहून. या पुस्तकात असे लिहले आहे. याचे दाखले देवू नका.हसा आणि हसवा.अस्सल विनोदंची देवानघेवान करा मनोरंजक माहिती दुसर्यांना पाठवा. आफवा पसरून देवू नका. खात्री चे वृत्त पुढे पाठवा. परस्त्री माते समान मानून कोणत्याही अनोळखी महिलेची छायाचित्र,व्हिडीओ पोस्ट करू नका चुकीचा व्हयरल झालेला फोटो, व्हिडीओ रोखणे फार आवघड तेव्हा पोस्ट करते वेळी काळजी घ्या. विनोदाने पाठवलेला एक शब्द एखाद्या चे जीवन संपवू शकते. एखादा बदनाम होऊ शकतो हे विसरून चालणार नाही. व्हाटस्अप वर किती मित्र आहेत त्या पेक्षा ते कसे आहेत हे फार महत्वाचे. आपल्या व्हाटस्अप वर किती गर्दी आहे. या पेक्षा आपण नाती कशी सांभाळत आहोत याला महत्व आहे. दूरचे मित्र जवळ येतात. मात्र समोरासमोर होणा-या गप्पा रंगत नाही ही खंत आहे. पारावरच्या गप्पा बंद होत आहेत. राजकारणातील गप्पा जवळ जवळ नामशेष झाल्यात.वाचन कमी होत चाललं आहे. पुस्तकांची कपाटे बेवारशी पडली आहेत. वाचनालय नि तेथील कर्मचारी वाचकांची वाट पहात आहेत. आणि आम्ही तरूण गुरफटुन गेलो आहोत . वाॅट्स अॅप वर. आता आम्ही लिहणं ही हरवतो की काय अशी वेळ आली आहे. पैशाचा नि वेळेचा अपव्यय होत आहे आणि आम्ही म्हणतो वेळ नाही. सुसंवाद विसरलोय आम्ही. गप्पांचे फड विसरलोय आम्ही. वाॅट्स अॅप ची गरज किती? महीत नाही. पण आम्ही खो खो हसणे विसरलोय .माणूस माणसाला विसरला आहे. प्रा.श्री. धनाजी जनार्दन बुटेरे पोई कल्याण ठाणे

शुक्रवार, २१ एप्रिल, २०१७

हे जीवन सुंदर आहे. (लेख)

                            निसर्गाची सर्वात सुंदर रचना म्हणजे माणूस. मानव म्हणजे त्याला भावभावना आल्याच.कोणी सुखी तर कोणी दुःखी. सुखाने माणूस हुरळून जातो तर दुःखाने खचून जातो.ही प्रक्रिया अव्यहतपणे निरंतर चालू आहे. कुणाच्या वाट्याला फक्त दुःखच आहे तर कोणी जन्मतःच तोंडात सोन्याचा चमचा घेऊन येतो.हा प्रत्येकाच्या नशिबाचा भाग असतो.पृथ्वीवर जसे खाच खळगे आहेत, तसे मानवी जीवन सुख दुःखाने भरलेले आहे. यात राणी कुंती सारखी व्यक्ती ती दुःख पचवते.पण कमजोर दिलाचे तेथेच आपली जीवनयात्रा संपवितात.मानव जन्म पुन्हा आहे की नाही माहित नाही संत ही म्हणतात नर देह तेतीस कोटी योनीतून जन्म घेतल्यावर मिळतो.म्हणून संत मानवीदेह हा दुर्लभ आहे असे म्हणतात. म्हणून या जन्मात नर देहाचा आनंद घ्या.
            व्यक्तीपरत्वे सुख दुःखाच्या व्याख्या बदलतात कुणी नापास झाला म्हणून जीवन संपवितो, कुणी कमी गुण मिळाले म्हणून आत्महत्या करतो. कोणी मेरीट थोडक्यात हुकली म्हणून आत्महत्या करतो. तर कुणी मेरीट मधिल पहिला नंबर चुकला म्हणून आत्महत्या करतो. येथे अती महत्वाकांक्षा हे दुःखाचे मूळ आहे हे लक्षात घ्या. विश्वात कोणत्याही गोष्टी परीपूर्ण नाही मग मी परीपूर्ण कसा असेन ? हा प्रश्न स्वतः ला नेहमी विचारा.चंद्राला पूर्णत्व येण्यासाठी अपूर्णातून जावे लागते निरनिराळे आकार धारण करावे लागतात तेव्हा कुठे पूर्ण चंद्र तयार होतो.मला प्रत्येक गोष्ट लगेच कशी मिळेल? मला जर खरोखरच सुखी व्हायचे असेल तर मी माझ्या पेक्षा गरीब माणसाकडे पाहिले पाहिजे. मुक्याने पागळ्याकडे पाहून सुखी व्हायचे. पागळ्याने आंधळ्याकडे पाहून सुखी व्हायचे. आणि आंधळ्याने पक्षाघाताने वाचा गेलेल्या,  अंथरुणात निपचित पडलेल्या मानसाकडे पाहून सुखी व्हायचे.
शेजारी फ्रिज आहे एसी.आहे. आपल्या कडे नाही तर आयुष्यात कायम दुःखी रहाल.आहे त्यात सुख माना सुख पायावर लोळण घेईल. मात्र स्वप्नांच्या मागे धाऊन अपयश आले तर दुःख न मानता जे प्राप्त होईल त्यात आनंद शोधा जीवन सुंदर होईल.
             आयुष्य जगताना खेळकर वृत्तीने  सामोरं जा.रस्त्यावर जाताना पाय घसरून पडलात.लोक खो खो हसणार तुम्ही ही हसा.पडल्याचे दुःख वाटणार नाही. पण आता आपण पडलो. म्हणून लोक हसतील हा विचार घेऊन ऊठलात तर नक्कीच दुःख व्होईल.
बरीच माणसं पडल्याने दुःखी होत नसतात .तर पडल्यावर लोकांनी पाहिले या गोष्टींवर दुःखी होतात.
   लहान मूल पडले म्हणून रडत नाही सगळे आपण पडल्यावर हसले याचे वाईट त्याला वाटते म्हणून ते रडते.विदूषक हा सर्कसमध्ये लोकांची हसवणूक व्हावी म्हणून निर्माण केलेले पात्र पण त्याच व्यंगाचा उपयोग तो आपल्या चरितार्थासाठी उपयोग करून आनंदी होतो.
             माझ्या परीचयाचे जोशी दांपत्य आहे सुखीकुटुंब म्हणून लोक त्यांच्याकडे बोट दाखवतात . पण सौ.जोशी यांच्या आनंदाची कल्पना मध्येच बदलली आणि जोशी दांपत्य दुःखी झाले. सौ.जोशी यांना सोन्याच्या दागिन्यांनचा मोह झाला. जोशी काकांनी कर्ज काढून बायकोची हौस भागविली.आणि काकांची कर्जाचे हफ्ते नि कुटुंबाचीा जबाबदारी सांभाळत सांभाळत नाकी नऊ आले. मिळणारी मिळकत तुटपुंजी त्यात घर ,कर्जाचे हफ्ते, सण ऊत्साव, पाहुणेराऊळे यात काका वैतागून गेले. काकांचा पेपर बंद झाला, दाढी हाताने झाडू लागले. इस्त्रीला परीट लागायचा आता हाताने इस्त्री होते.
रिक्षा बंद झाली. पायपीट वाढली.केबल वाला बंद झाला. सुटीचे फिरणे बंद झाले.काकुंना फरक नसेल पडला पण काकांना नक्कीच पडला. आता दागिन्यांनी हौस ती मेली केवढी पण काकांच्या आनंदात विरजण पडले.मग आता मला सांगा सुख ते काय?
         अभिलाषा ही केंव्हा केंव्हा माणसाला दुःखाकडे ओढते.मला ऐश्वर्या सारखी सुंदर बायको हवी.सुंदर समजू शकतो पण ती " एश्वर्या  "सारखीच
का असली पाहिजे? माझ्या कडे कार हवी.पण ती मर्सीडीजच का?झोपडीत राहणारा टुमदार कौलारू घराचे स्वप्न पहातो. त्यात वावगे काहीच नाही. पण बंगला असणारा हवेलीचे स्वप्न पहातो. हवेलीत रहाणार राजवाड्यांचे स्वप्न पहातो. येथे अभिलाषा ही दुःखाचे मूळ आहे. नगरसेवकाला वाटते आमदार व्हावे. आमदार म्हणतो नामदार व्हावे. मंत्री म्हणतो मी मुख्यमंत्री व्हावे. मुख्यमंत्र्यांला वाटते सर्व महत्त्वाची खाती आपल्याकडे असावी. किंवा आपण केंद्रीय मंत्रीमंडळात असावे.किंवा आपण पंतप्रधान असावे.पंतप्रधानाला वाटते ही खुर्ची मरेपर्यंत कुणालाच भेटू नये म्हणजे कोणीच समाधानी नाही. सर्व मिळून सुध्दा माणूस आत्मसंतुष्ट नअसल्यामुळे तो दुःखी आहे. परंतु मूळ कारण अभिलाषा हेच होय.
          संसारात सर्वत्र दुःखाचे मळभ दाटलेले आहेत. आपण त्यामधे आपला आनंद शोधला पाहीजे."पेला अर्धा भरलेला आहेत "म्हणून सुखी व्हायचे .' की " पेला अर्धा रिता आहे. "म्हणून सुखवस्तू व्हायचे हे आपण ठरवायचं. मुलगी झाल्यावर बाप झालो याचा आनंद मानायचा की वंशाच्या दिव्यांचे काय?म्हणून दुःख मानत बसायचं हे आपल्या हातात आहे.
       सुख प्रत्येक गोष्टीत आहे. मदरतेरेसाना ते दीनदुबळ्यांच्या सेवेत सापडले.बाबा आमटेना महारोग्यांच्या सेवेत मिळाले. गाडगे महाराजांना समाजसेवेत सापडले. लता मंगेशकरांना गाण्यात सापडले. सिधुताई सकपाळ यांना निराधार मुलांनमधे गवसले.दुस-याला सुखी करून  स्वतःही सुखी झाले.
        आपल्या सुखाच्या कल्पना वेगवेगळ्या असतात. त्या आपणास सुखवादी बनवतात.कधी निराशा पदरी पडते.मग कपाळमोक्ष ठरलेला म्हणून समजा.चिमूटभर सुखासाठी माणूस आभाळभर सुखाची होळी करतो.आकाशातील चांदण्या हातात येत नसतात. त्या पाहून सुख मिळवा.राजा महालातून असतो पण तरी तो सुखी नसतो.खरं सुख गवताच्या झोपडीत असते. पैशात सुख मानणारा वर्ग फार मोठा आहे. पण पैसा दुःखाचे मूळ कारण आहे. पैशात सुख असते तर जगातील दहा श्रीमंत सर्वांत सुखी असते.पण तेमुळीच सुखी नाही. सुख हे क्षणभंगूर आहे. ते नश्वर आहे. दुःख माणसांचे सोबती आहे.
कारण ते मानसाची पाठ सोडत नाही.
              प्रा. धनाजी जनार्दन बुटेरे
                -   पोई कल्याण ठाणे