कवी श्री धनाजी जनार्दन बुटेरे आपले शब्दांचा गुलमोहर अनुदिनी वर आपले स्वागत करीत आहे सर्व कविता, लेख, कथा याचे स्वामीत्व हक्क राखून ठेवले आहेत.

शनिवार, २२ जानेवारी, २०२२

आता पंख फुटले

   आता पंख फुटले

तेव्हा रांगत असायची अवतीभवती.
त्यांची काय ती नवनवती.
त्यांच्या खिदळण्याने घर झोपायचे.
आणि रडण्याने घर उठायचे.
आईच्या पदराआड घरभर..
रांगायची चिमुकली पावलं.
आणि आजीचा शब्द
अलगद घ्यायची कानात साठवून.
घराला घरपण होते.
बाईला आई पण होते..
त्यांची पाटी पुस्तके,
वाचायला शिकलं हे घर,
आता काळ सरकला थोडा पुढे.
पिल्लांच्या पंखात बळ आले.
ती उडायला शिकली.
आता बाबा आणि आई
त्यांच्यासाठी कोण कुठले?
कारण पिल्लांना आता पंख फुटले. 

प्रा.श्री.धनाजी जनार्दन बुटेरे

मंगळवार, ९ मार्च, २०२१

शृंगार

शृंगार

माझ्या सावित्रीमाईने
लेकी शिकविल्या किती.
तिने लावियेले पंख
तिने दिली त्यांना गती.

लेक इंदिरा लाडकी
तिच्या गळ्यातील मणी
आणि कल्पना चावला
झाली आकाशी दामिणी.

तिच्या किरण बेदीने
वर्दीला आणली शोभा.
झाली डाॅक्टर आनंदी
नारी भरारली नभा.

पोरं  लता बहरली
गाणे केले तिने सोने.
घरदार उध्दारले.
मुखी तिचेच तराणे.

पोरी शिकाया लागल्या
बाप झाला बिनघोर.
अन्याय टाकी मान
अत्याचार कमजोर.

पोरी शिकल्या शिकल्या
उजाळले घरदार.
झाली राष्ट्राची प्रगती.
बाई देशाचा शृंगार.

श्री धनाजी जनार्दन बुटेरे

शनिवार, १६ जानेवारी, २०२१

"शेतकरी हत्या की आत्महत्या?"

                            नुकताच एका वृत्तपत्रात शेतकरी आत्महत्येची बातमी वाचली. आणि मन सुन्न झाले. गेल्या वर्षभरात महाराष्ट्रात आकराशे शेतक-यांनी मृत्यूला कवटाळून घेतले.तर सन 2001 पासून तर आज पर्यंत म्हणजे गेल्या 19 वर्षात 16,918 शेतक-यांनी मृत्यूला जवळ केले आहे.हे फक्त विदर्भ व मराठवाडा या दोन प्रदेशात शेतकरी मृत्यूचे हे तांडव सुरू आहे. सरासरी दर आठ तासात एक शेतकरी मृत्यूला कवटाळून घेतो आहे. नक्कीच हे चित्र समृद्ध महाराष्ट्राला न शोभनीयच आहे. एकी कडे आमची याने परग्रहावर घिरट्या घालत आहेत. आणि दुसरी कडे मृत्यू शेतक-यांच्या घरावर घिरट्या घालत आहे. भारत विकसित होण्याच्या उंबरठ्यावर उभा आहे.आणि शेतक-याच्या दारावर मृत्यू दस्तक देतो आहे. एकीकडे आस्मानी सकंट त्याच्या समोर आ वासून उभे आहे.कधी दुष्काळ, तर कधी अवकाळी पाऊस. दोन्ही बाजूने तो संकटाच्या कचाट्यात सापडला आहे. दुष्काळात दुबार पेरणी, तर कधी हातातोंडासी आलेला घास आतीवृष्टी होऊन हिरावला जातो.विदर्भ व मराठवाडा हा जवळजवळ संपूर्ण शेतीवर आधारित प्रदेश. पिकराई आली की बळीराजाच्या घरात गोकूळ अवतरते.पण दुष्काळात मात्र सारे हरवून जाते.मग उरतो जगाच्या पोशिंद्या समोर पर्याय स्वस्त मरण्याचा.आपण म्हणतो शेतकरी मेला.
           राज्यात सरकारे येतात.नि जातात.सत्तेच्या मोहापायी या भाबड्या बळीराजाला कैक आश्वासने देतात.सत्ता आली की सारे मूग गिळून गप्प. एक मात्र खरे आजपावतो विरोधीपक्ष मात्र नेहमी शेतक-यांच्या पाठीशी राहिला आहे. पण सत्ता आली की तेच कालचे विरोधक शेतक-यांच्या तोंडाला पाने पुसतात. पण शेतकरी का मरतो ?हे आजून तरी कुणी या विषयाच्या मुळाशी जाऊन पाहिले नाही.ना शेतकरी आत्महत्येची गूढ शोधणारी एखादी कमेटी बसली,ना एखादा आयोग आला.फक्त शेतकरी कर्जबाजारीने मेला एवढेच माहीत आहे. शेतक-या आयुष्यात नेहमीच दुष्काळ असतो असं नाही.कधी तरी आबादानी येते.पण एकाच वेळी एकाच प्रदेशातून एकाच प्रकारच्या मालाची इतकी आवक येते ; की शेतमाल कवडीमोल भावाने द्यावा लागतो.नाही तर फेकून तरी द्यावा लागतो.आधीच कर्जबाजारी त्यात मालाला भाव नाही. आणि मग एक दृष्टचक्र त्याच्या वाट्याला येते.आज बाजारात टाॅमेटोचा भाव पाच ते दहा रुपये किलो आहे. मेथी जी महिन्याभरापूर्वी पन्नास रुपये दराने विकली जात होती.ती दहा रुपये दराने विकली जाते.मटार दीडशेच्या दराने विकली जात होती. आज ती वीस ते तीस रुपये दराने विकली जात आहे. बरं हा शेतमाल आपण दलाला मार्फत घेतो.मग विचार करा ? शेतक-याला या पाच रुपयातून किती रुपये मिळाले असतील.कसं त्याने कर्ज फेडावे ? कसं घर साभाळावे की सावरकराचे देणे द्यावे. बर सावरकरांचे नाही दिले की चक्रवाढ दराने पैसे फेडणे आले.पुढच्या वर्षी नक्की पिक येइल की नाही? ते ही सांगता येत नाही.? 
भास्कर चंदनशीव यांची एक कथा आहे "तांबडा चिखल " टाॅमेटोची इतकी आवक वाढते की कुणी फुकटपण घेत नाही मग नायक संतापतो. नि टाॅमेटोचा चिखल करतो.तोच हा तांबडा चिखल हा चिखल शेतक-याच्या वाट्याला येतो.जास्त आवक आली म्हणून माल निर्यात करता येतो.पण तशी सुविधा आपणाकडे खेड्यापाड्यात नाही. दुसरी गोष्ट भारतीय शेतमाल युरोपीयन राष्ट्र थेट स्वीकारत नाही. पुन्हा येथे चाचण्या आल्या. कीटकनाशकांचा प्रमाणापेक्षा जास्त वापर झाल्यास युरोप मधे या मालाला बंदी आहे.म्हणजे एक तर शेतक-यांना या विषयी प्रशिक्षण द्यावे लागेल.त्या ही पेक्षासोपा मार्ग म्हणजे शेतमालावर प्रक्रिया करणारे उद्योगधंदे शेतक-यांच्या जवळपास निर्माण झाले पाहिजेत.टाॅमेटो साॅस दिडशे किलो.पण टाॅमेटो दहा रुपये.अशी कोणती जादू होते.भांडवलदार शंभरपट नफा कमावतो.आणि शेतकरी जो वर्षभर काबाडकष्ट करतो.त्याला मूळ खर्च सुध्दा मिळत नाही.थोडक्यात शेतमाल शेजारी शेतमालावर प्रक्रिया करणारे उद्योगधंदे निर्माण झाल्यावर शेतक-याला कोणताच शेतीमाल कवडीमोल किमतीने विकावयास लागणार नाही.किमान राज्य सरकारने शितगृहे उभी करावी. किमान शेतमाल मुंबई दिल्ली चेन्नई यासारख्या महानगरांमधे पाठविण्यासाठी स्वस्तास रेल्वे सेवा. किंवा विमान सेवा.तसं ही कुठे दिसत नाही.मग आवक वाढली की शेतमाल फेकण्यात शिवाय शेतक-याकडे दुसरा पर्याय पण नसतो.
                                   कृषी उत्पन्न बाजार समिती प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी आहे.पण येथे शेतमाल दलाल घेतात.जर शेतक-यांना शेतमाल विक्रीसाठी गाळे उपलब्ध करून दिले तर थोडा फार पैसा त्याच्या हातात येईल .पण येथे ही सरकारची उदासिनता दिसते.त्यामुळे दलाला मोठे झाले. मागील महिन्यात कांद्याची दोनशेचा आकडा गाठला.पण यात शेतक-यांचे कांदे किती होते.  शून्य !:जर हा भाव शेतक-याला मिळाला असता तर नक्कीच तो सुखावला असता; पण येथे दलाला माजले.जर सरकारने शेतक-यांना कांदाचाळीसाठी बीनव्याजी कर्ज किंवा काही अनुदान दिले तर कांदा कवडीमोल दराने विकण्यापेक्षा तो कांदा चाळीत जाईल.नि बळीराजा सुखावेल. 
                         लग्न परंपरा ही एक शेतकरी आत्महत्येचे कारण आहे. त्यात मुलीच्या लग्नात हुंडा द्यावा लागतो.कायद्याने हा गुन्हा आहे.पण हाच गुन्हा महाराष्ट्रातील कितेक आईवडील बीनदिक्कत करतात.तसा गुन्हा आपण केला आहे हे ना नवरा वा नवरी मुलीच्या नातेवाईकांना वाटत असते. लग्न समारंभात केला जाणार प्रचंड खर्च गरीब शेतक-याच्या जीवावर उठतो.मुलीचे लग्न आहे.म्हणून जास्त शेती कसळायला घेतली जाते.बी बियाणे, खत,मशागत,यंत्र सामग्री, या वर खर्च केला जातो.निसर्गाने जर धोका दिला की सर्व आकांक्षावर पाणी फेरले जाते. आणि गरीब मुलीचा बाप स्वतः जगण्याच्या लायक समगत नाही. जर आली तर सरकारी मदत येईल कदाचित त्या पैशातून लेकीचे लग्न होईल या आशेवर गरीब शेतकरी स्वतःच स्वतः पणाला लावतो.आणि या जगाचा निरोप घेतो.
           काही ही असो पैसा हा शेतकरी आत्महत्येचे मूळ कारण आहे.कर्जमाफी यावर उपाय होऊ शकत नाही. त्यापेक्षा सरकारने शेतकरी बॅक काढून. शेतक-यांना दीर्घ मुदतीची काही लाख रुपयांची कर्जमाफी दिले.तर बराच फरक पडेल.बरेच शेतकरी बांधव.मरणापासून वाचतील.कारण सरकार कोटी कोटी प्रकल्पासाठी  खर्च करतो.तर हा शेतकरी वाचवण्याचाही प्रकल्प हाती घ्यावा ही मायबाप सरकारला विनंती. नाही तर शेतकरी आत्महत्या नसून त्या हत्याच ठरतील.

प्रा.श्री धनाजी जनार्दन बुटेरे 
मु.पोई,पो.वाहोली ता.कल्याण जि ठाणे 
            

शुक्रवार, ३० ऑक्टोबर, २०२०

भुईआकाश


भुई

क्षितीजाने एकदा 
भुईला म्हटले.
तू किती छान आहेस.
भुई म्हणाली क्षितीजाला 
तू तर फुललेलं रान आहेस.

तेव्हा पासून क्षितीज 
धरणीची आस ठेवून जगतो.
धरती एकदा मिठीत घेईल 
ध्यास घेऊन जगतो.

कधी धरती साथ देईल
म्हणून क्षितीज निढळावर 
ठेवून आहे हात.
धरेने निसंकोच 
फुलून घ्यावे अंतराळात. 

धनाजी बुटेरे 

बुधवार, २२ जुलै, २०२०

अशी माणसे श्रध्दांजलीपर लेख

                        गेल्या चार पाच महिन्यापासून अप्रिय बातम्यानी मन घायाळ झाले आहे.नकोनको अशा बातम्या मनपोखरून टाकत आहेत.कोरोना नावाचे संकट दूर कोठून तरी चीनमधून हळूहळू भारतात घुसले, आणि पसरलेही.आता कोरोनाने चांगलेच ठाण मांडले आहे.नव्हे हातपाय पसरले आहेत.असंख्य जीवांचे प्राण घेऊन ही अजून तो थांबायला तयार नाही.असंख्य माणसे आपल्याहून आगदी अगंतूक निघून गेली.जगाचे काय नुकसान व्हायचे ते झालेच.पण आमच्या पोई,ता.कल्याण गावातील दोन सख्या भावंडांनी या जगाचा निरोप घेतला.ही घटना समस्त ग्रामस्थांना चटका लावणारी घटना होय.कै.चंद्रकांत हरड,आणि कै. बाळाराम हरड, या दोन ग्रामस्थांनी जगाचा निरोप घेतला.
           दोघे ही सरकारी सेवततून सेवनिवृत्त झालेले.कै.चंद्रकांत हरड आयुध निर्माणी अंबरनाथ येथे तीस जूनला सेवानिवृत्त झाले.तर कै.बालाराम हरड सात आठ वर्षांपूर्वी प्रदीर्घ शिक्षक सेवेतून सेवानिवृत्त झाले होते.पण सेवानिवृत्ती नंतर आठच दिवसात कोरोनाने त्यांना आपल्यातून ओढून नेले.आणि वीस जुलै रोजी कै. बाळाराम हरड यांनीही जगाचा निरोप घेतला.दोघांचे येथून जाणे चटका लावणारे.
           नोकरी निमित्ताने ते आपल्या गावापासून थोडे दूर रहात होते.पण मनमात्र कायम गावात गुंतवून राहिले.त्याचे सतत पोई येथे येणे होते.बाळाराम हरड सच्चे कलावंत होते. गावात त्यांना अदराने सारे गुरुजी संबोधायचे.एक नाट्यवेडा माणूस.पोई गावची परंपरा ही नाटकांची आहे.जुन्या जाणत्या कलावंतात त्यांनी अभिनय केला.ऐतिहासिक नाटकातून आणि सामाजिक नाटकातून त्यांनी अभिनयाची चुनूक दाखविली.
त्यांच बरोबर नव्या जोमाच्या मंडळीत ते अभिनय करायचे.माझ्या गावाने एक सच्चा नाट्यकलावंत गमावला.
                         माझ्या चुलत्यांबरोबर त्यांची लहानपणापासूनच ची दोस्ती होती.खरे तर ते एक शिक्षक पैसा आडका असणारा माणूस, तर माझे चुलते शेतकरी,पण दोंघाममध्ये गरीबश्रीमंताची भिंत कधी उभीच राहिली नाही.गेल्या साठ पासष्टाव्यावर्षीही त्यांची मैत्री आबादित होती.आगदी या जगाचा निरोप घेण्या आधीही ते आपल्या मित्राच्या घरी पायधूळ झाडून आलेच.ती त्यांच्या मधिल शेवटची भेट.
                     सेवानिवृत्ती नंतर त्यांनी स्वतःला अध्यात्मा मधे बांधून घेतले.आणि ईश्वरसेवेत आपला वेळ देऊ लागले.गावात महिला भजनी मंडळ असावे.ही कल्पना गुरुजींची ती त्यांनी प्रत्येक्षात आणली.ते स्वतः हारमोनियम वादक होते.त्यामुळे गावातील महिलांना त्यांनी भजनाचे धडे गिरवले.
आणि भजनीमंडळ तयार केले.ही गावाला दिलेली गुरुजींची देणगी.
                                                                भागवत सप्ताहा हनुमान जयंती,काकड आरती.मधे गुरुजी सक्रिय असायचे.जणू आपल्या घरचेच कार्य समजून ते झटायचे.आमच्या गावातील एक सांस्कृतिक ठेवा म्हणजे भजनी भारुड.पूर्वापार चालत आलेली ही परंपरा जवळ जवळजवळ नष्ट होत आली होती.पण गुरुजींमधल्या कलावंताने एकनाथांची भारुडे जीवंत केली.पुन्हा नव्या जोमाने ते हनुमान जयंतीच्य मिरवणुकीत ते रात्रभर भारुडात तल्लीन व्हायचे.आपली पत्नी, भावजय यांनाही त्यांनी भारुडात आणले.आणि गावचा हा सांस्कृतिक ठेवा जिवंत ठेवला.गुरुजीं गाव आपल्याला कधीच विसरणार नाही. आपल्या जाण्याने गावातील ग्रामउत्सवा मध्ये नक्कीच आपली आठवण येत राहील.आपणास दोघा बंधुना ही भावपूर्ण श्रध्दांजली. 

    

मंगळवार, १२ मे, २०२०

चैतन्याचा झरा



चैतन्याचा झरा

ही गोष्ट आहे 2000 मध्ये मी बीए ला होतो. घरची परिस्थिती जरा बेताचीच होती मला बीए करून बीएड करायचं होतं कारण माझे ध्येय होतं शिक्षक होणे त्यावेळेस अनुदानित साठी 14 हजार रुपये आणि विनाअनुदानित साठी चाळीस पंचेचाळीस हजार रुपये  एवढे चाळीस पंचेचाळीस हजार रुपये भरण्यास मी असमर्थ होतो.जर चांगले मार्क मिळाले तर माझे बी.एड.फक्त चौदा हजार रुपयांमध्ये होणार होते.
मग माझ्याकडे एकच पर्याय शिल्लक होता चांगले मार्क पाडणे.त्यामुळे बीए ला प्रथम श्रेणी मध्ये येण्यासाठी माझी धडपड सुरू झाली.मी गावात रहात होतो.माझे गाव कल्याण पासून वीस किलोमीटर अंतरावर आहे.गावात घरी सतत मित्र,माणसे यांचा राबता असायचा.त्यामुळे मला अभ्यासात सतत व्यत्यय यायचा.मग मी घरा पासून दहा पंधरा मिनिटे चालायला लागतील एवढ्या दूर अंतरावर आमराईत
आंब्याच्या झाडाखाली जाऊन अभ्यास करायचो.दुपारी दोन वाजेपर्यंत मी असल्यास करायचो मग जेवण करून ताबडतोब पुन्हा आमराईत जायचो.माझी ही केविलवाणी धडपड पाहून मग आई रोज भर दुपारी रणरणत्या उन्हात माझ्यासाठी जेवणाचे भरलेले ताट हातात  पाण्याचा तांब्या (तेव्हा पाण्याच्या बाटल्यांचा जन्म झाला नव्हता) घेऊन आई वाट तुडवत यायची.मी आईच्या समोरच हात धुवायचे आणि पटापट चार घास पोटात घालायचो. मग आईच्या पदराला हात पुसून पुन्हा अभ्यासाला लागायचो.मला हे जगातले सगळ्यात मोठे सुख वाटायचे.मी  सकाळी सात ते संध्याकाळी साडेसात पर्यंत जोपर्यंत डोळ्यांना दिसते.तोपर्यंत मी वाचत राहायचो.पण आंध्र पडून गेला की आईचे डोळे वाटेकडे लागायचे.जास्तच उशीर झाला की आई मला शोधत आमराईत यायची.जगात एवढे प्रेम फक्त नि फक्त आईकडे असते.आता आई रक्त चालली आहे.आयुष्याचे काही वर्ष शिल्लक राहिले आहेत.पण हा प्रेमाचा झरा अजून आपला नाही. तो कधी अटूच नये.माझे वडील तर लहानपणच माझा हात आईच्या हाती देऊन दूर निघून गेले.पण आईच्या प्रेमाचा निखळ  झरा माझ्यासाठी ठेऊन गेले.तोच मायेचा झरा माझ्या आयुष्यात चैतन्य आणतो.याच झ-याच्या ओढीने शाळेला सुट्टी लागली की पाय आपोआप माझ्या जन्मगावी धाव घेतात.
श्री.धनाजी जनार्दन बुटेरे
कल्याण ठाणे